RSS chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांच्या एका वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या आहेत. अयोध्येनंतर काशी आणि मथुरेत मशीद-मंदिर वाद उफाळून आलाय. कुतुब मिनार हा मूळचा विष्णूस्तंभ असल्याचा वादही गाजतोय. मात्र असे वाद उकरून काढणं टाळलं पाहिजे, प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता? अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवतांनी कानउघाडणी केली आहे. राममंदिरानंतर आता कोणतंही आंदोलन होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं..
मुघलांच्या काळात मूळची हिंदू मंदिरं पाडून त्याठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या, अशी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांची धारणा आहे. त्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले जातायत. पण मुस्लिमांचे पूर्वज हिंदूच होते. त्यामुळं आपापसात चर्चा करून वाद मिटवा, असा तोडगा भागवतांनी सुचवला आहे.
मशीद-मंदिर वाद मिटवण्याच्या दृष्टीनं सरसंघचालकांचं हे वक्तव्य महत्वाचं ठरणाराय. शिवसेनेनं देखील भागवतांच्या भूमिकेचं स्वागत केलं. त्याचवेळी काश्मीर मुद्यावरून केंद्र सरकारला टोले लगावले आहेत.
बाबरी मशिदीसाठी आंदोलनाचं रान पेटवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि बाबरी पाडल्याचा सार्थ अभिमान मिरवणाऱ्या शिवसेनेची ही समंजस भूमिका आणि समाजातली हिंदू-मुस्लीम दरी मिटवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उचललेलं हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.