पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रा. स्व. संघ जनकल्याण समितीचा पुढाकार

अकल्पित झालेली अतिवृष्टी आणि धरणांतून केलेला जलविसर्ग यांमुळे महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये विक्राळ अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

Updated: Aug 12, 2019, 06:41 PM IST
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रा. स्व. संघ जनकल्याण समितीचा पुढाकार title=

पुणे : अकल्पित झालेली अतिवृष्टी आणि धरणांतून केलेला जलविसर्ग यांमुळे महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये विक्राळ अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने विविध ठिकाणी मदत कार्यांना सुरूवात करण्यात आली आहे. या मदतकार्यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्ते आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मुख्यत: सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणाखाली यावी यासाठी शर्थीचे प्रयल चालू आहेत.

रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या वतीने आतापर्यंत सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, शिराळा आणि पलूस तालुक्‍यातील सुमारे ५०,००० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंदात हलवले आहे. सुरूवातीला २३५ नागरिकांची सुखरूप सुटका केल्यानंतर आता ३५,००० नागरिकांची दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

तीन ठिकाणी सुरू केलेल्या केंद्रांतून सुमारे ३०० स्त्री-पुरूष कार्यकर्ते सक्रिय आहेत . हेलिकॉप्टरने सुटका केलेल्या नागरिकांकरिता दर तासाला १ हजार भोजन पाकिटे एनडीआरएफ व जवानांकडे दिली जात आहेत.

सातारा जिल्ह्यात सातारा, कराड आणि पाटण येथील १ हजारापेक्षा अधिक नागरिक आपत्तीत सापडले आहेत. समितीने २०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली असून पाटण परिसरात ७० आपदरग्रस्तांना रग व चादरींचा पुरवठा केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर, करवीर, शिरोळ तालुक्‍यातील ३८,००० व्यक्तींची तात्पुरत्या निवास स्थानात व्यवस्था केली असून २२ केंद्रांत एकूण २५० स्त्री-पुरूष कार्यकर्ते मदत कार्यात व्यस्त आहेत. 
दहा आरोग्य तपासणी केंद्रात प्रथमोपचार, ६००० लि. पेयजलाचे वितरण त्याचप्रमाणे औषध व कपडे वितरणही चालू आहे. कोल्हापूर शहर व इचलकरंजी, वारणा कोडोली येथे पुरात अडकलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढून झाल्यावर कोल्हापूरमधील ६ व इचलकरंजी येथील ४ पूरग्रस्त केंद्रांचे संपूर्ण पालकत्व घेण्यात आले आहे. 

सर्व व्यवस्था रा.स्व. संघ, जनकल्याण समिती व राष्ट्र सेविका समिती यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शहरातील २३ केंद्रांवर ३२ डॉक्टर्स व त्यांच्या सहाय्यकांची टीम अविरतपणे काम करत आहे.

नागरिकाना नागरीकांना मदतीचे आवाहन 
पूर नियंत्रणानंतर आरोग्याची काळजी, घरांची स्वच्छता, निर्जंतुकांची फवारणी, आवश्यक त्या घरांची दुरूस्ती इत्यादी कामांना सुरूवात करावी लागेल. समितीला सध्या केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा असून या देणगीला 80 जी सवलत लागू आहे. 

इच्छुक दात्यांनी आपले धनादेश "रा . स्व . संघ जनकल्याण समिती” या नावाने काढावेत. दोन हजारांपर्यंत रोखीने रक्‍कम जमा करता येईल किंवा बॅक ऑफ महाराष्ट्र, टिळक रोड शाखा, बचत खाते कमांक - 20057103852, IFSC - MAHB0000041 या क्रमांकावर भरणा करून नाव, पत्ता, फोन नंबर, पॅन क्रं. इत्यादी माहिती rssjanklyan@yahoo.co.in या पत्त्यावर कळवावी, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.