पूनम महाजन यांना शरद पवारांच्या नातवाचे जोरदार प्रत्युत्तर

पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. त्याचवेळी आता पवार यांचे नातू रोहित यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Updated: Feb 5, 2019, 09:30 PM IST
पूनम महाजन यांना शरद पवारांच्या नातवाचे जोरदार प्रत्युत्तर title=
छाया - Rohit Rajendra Pawar फेसबूक वॉल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख 'शकुनी मामा' असा केल्यानंतर दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजप खासदार खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. त्याचवेळी आता पवार यांचे नातू रोहित यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावेळी तुम्ही काय डोळ्यांवर पट्टी बांधून होतात का? आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीले ते आपणच सांगू शकता, असा थेट सवाल केला आहे. भाजपची काय संस्कृती आहे, ती दिसून येत आहे. मंत्री गिरीश महाजन, गिरीश बापट आणि तुमचे आमदार राम कदम महिलांबाबत काय व्यक्तव्य करतात, ते पाहा, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना तीन प्रश्न केले आहेत. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत पूनम महाजन यांना हे प्रश्न विचारले आहेत. सोशल मीडियासह सर्वच स्तरातून रोहित पवारांच्या प्रत्युत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.

पूनम महाजन यांना तीन प्रश्न :

पवारांना 'शकुनी मामा' म्हणणाऱ्या पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

1. गिरीश महाजन म्हणाले होते,
“दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.”

2. गिरीश बापट म्हणाले होते,
“तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.”

3. राम कदम म्हणाले होते,
“पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे… आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या का? 

पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने मुंबईत पोस्टरबाजी केली आहे. रविवारी मुंबईत सीएम चषक युवा महासंगम या क्रीडा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात पूनम महाजन यांनी महाआघाडीवर बोलताना शरद पवार यांचा उल्लेख 'महाभारतातील शकुनी मामा' आणि 'रामायणातील मंथरा' असा केला होता. पवारांवर केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करणारी पोस्टरबाजी मुंबईत केली आहे. अहो चिऊताई... महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती  है, प्रविणने प्रमोद को क्यों मारा?, असा हल्लाबोल पोस्टरबाजी करत केला आहे.

'सभ्यता सोडायला एक मिनिटही लागत नाही'

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पूनम महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘पूनमताई महाजन… स्व. प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आपण कसे काय विसरलात ? आपण प्रसिद्धीसाठी शरद पवारांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो. आपल्या वडिलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. सभ्यता सोडायला एक मिनिटही लागत नाही, असा थेट इशारा आव्हाड यांनी दिला आहे.