कर्जत : साताऱ्यातल्या सभेत शरद पवारांनी पावसाची तमा न बाळगता भाषण केलं. आता त्यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवारांनीही भरपावसात भाषण केल्याचं समोर आलं आहे. सगळ्यांनी एकत्र या, मतदान करा. आपल्या विचारांचा उमेदवार निवडून कसा येईल हे सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे असं रोहित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले. रोहित पवार भरपावसात ते विरोधकांवर बरसले. शरद पवार आणि रोहित पवार यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत सध्या एकच चर्चा आहे ती शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात केलेल्या भाषणाची. वयाच्या ७९ व्या वर्षी शरद पवार नावाचं हे तुफान अजूनही घोंघावतं आहे.
एकीकडं धो धो पाऊस कोसळत होत आणि दुसरीकडं शरद पवार बरसत होते. साताऱ्याच्या प्रचारसभेतलं हे दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेला हा ७९ वर्षांचा अँग्री यंग मॅन... शरद पवार हे काय अजब रसायन आहे, हे यानिमित्तानं उभ्या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पाहिलं. शुक्रवारच्या पावसामुळं अनेक नेत्यांनी आपल्या सभा रद्द केल्या. पण पाऊस पडतोय म्हणून मैदान सोडून जातील, ते पवार कसले. तुफान कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता, तब्बल २० मिनिटं ओलेत्या कपड्यांनी ते बोलत होते. पायाला झालेल्या जखमा, कर्करोगासारखं आजारपण, ईडीचं बालंट, सत्ताधारी पक्षाकडून होणारे वार आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडून गेलेले साथीदार. अशा कशाकशाची पर्वा न करता.
उदयनराजेंना पराभूत करून चूक सुधारूया, असं आवाहन पवारांनी या चिंब पावसाच्या साक्षीनं केलं.. तेव्हा सातारकरांनीही त्याला भरभरून दाद दिली. आपला नेता भर पावसात भिजत असताना, त्याचा शब्द न् शब्द झेलताना सातारकरही रोमांचित झाले होते.
पावसात भिजत भाषण करणाऱ्या ७९ वर्षांच्या पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवं स्फुल्लिंग चेतवलंच. पण कितीही संकटं कोसळली, तरी न डगमगता, घट्ट पाय रोवून कसं उभं राहायचं. आणि संकटांचा मुकाबला कसा करायचा, याचा धडाच या लोकनेत्यानं घालून दिला. पवार हे राजकारणातले पैलवान नाहीत, तर वस्ताद आहेत, याची खात्री पटली. यंदाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काहीही लागो, पण शरद पवार आधीच जिंकलेत. मॅन ऑफ द सिरीज ठरलेत.