Rohit Pawar On Nitin Gadkari: कॅगच्या अहवाल समोर आल्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. केंद्र सरकारच्या सहा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालात (CAG Reports) नमूद करण्यात आलं आहे. तर कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर देखील आरोप करत ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे आता नितीन गडकरी (Nitin Gadkari) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. नितीन गडकरी यांचं राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटल्याने आता राजकीय वर्तुळात सर्वांच्या भूवया उंचवल्याचं दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत, हा कट तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे.
दुकान चालायला लागतं तेव्हा गिऱ्हाईकांची कमतरता नसते. आता आमचं दुकान चांगलं सुरू आहे. गिऱ्हाईकांची कमी नाही. मात्र, खरे जुने गिऱ्हाईक कुठे दिसेना, असं भावूक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकारणाच चर्चेला उधाण आलंय. त्यावर रोहित पवारांनी नितीन गडकरींना (Rohit Pawar On Nitin Gadkari) पाठिंबा दर्शविला आहे.
केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही. कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही, परंतु कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी साहेबांच्या विभागावर लक्ष केंद्रित करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं वाटतं. शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे, असं म्हणत रोहित पवारांनी सुचक वक्तव्य केलंय.
केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी साहेब सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंका येते. असो! महाराष्ट्र भाजपा गडकरी साहेबांसोबत असेल की नाही हे माहीत नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी साहेबांसोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका… pic.twitter.com/o2d2xNy4cE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2023
दरम्यान, रोहित पवार यांच्या ट्विटनंतर आता सर्वांच्या भूवया उंचवल्याचं पहायला मिळतंय. असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीत तुरुंगवास सहन केला. अनेक संकटं सहन केली, अनेक आंदोलनं केली, त्यानंतर सत्तेत पोहोचलो, असं म्हणत असताना नितीन गडकरी भावूक झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रात नितीन गडकरींना पाठिंबा मिळताना दिसतोय.