'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान...'; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार

Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराज होतो असं गोविंदगिरी महाराजांनी अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींसमोर भाषण देताना म्हटलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 23, 2024, 08:48 AM IST
'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान...'; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार title=
सोशल मीडियावरुन व्यक्त केलं आपलं मत

Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर याच मंदिराबाहेरील एका भाषणात पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येच्या मंदिराबाहेर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रुपात आपल्याला लाभला आहे असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. यावरुनच आता रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे.

नेमकं काय म्हणाले गोविंदगिरी महाराज?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवस केलेला उपवास आणि 11 दिवस अधिष्ठान म्हणून जमिनीवर झोपण्याचा उल्लेख करत गोविंदगिरी महाराजांनी त्यांच्या तपश्चर्येचं कौतुक केलं. हे कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. "आम्ही तुम्हाला 3 दिवस जमीनीवर झोपण्यास सांगितलं होतं. तुम्ही या थंडीत 11 दिवसांपासून जमीनीवर झोपत आहात. मित्रांनो, ब्रम्हाने सृष्टीला निर्माण केलं तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता. तो भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा शब्द आहे. तप तप इती! आमच्या गुरुंचे गुरु परगुरु कांचीचे परमाचार्यजी महाराज करायचे तपश्चर. आज तपाची कमी होत आहे. आम्ही आज तो तप तुमच्यात पाहिला. ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो ज्यामध्ये हे सारं काही होतं. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज!" असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना

गोविंदगिरी महाराज इतक्यावरच न थांबता त्यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. "लोकांना कदाचित ठाऊक नाही. जेव्हा ते मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी श्री शैलमवर गेले तेव्हा 3 दिवसांचा उपवास केला. 3 दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी म्हटलं, मला राज्य नाही करायचं. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शीवाच्या तपश्चर्येसाठी जन्मलो आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत नेऊ नका. त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं आणि परत घेऊन आले की हे सुद्धा तुमचं कार्य आहे. आज आपल्याला तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा भारत मातेची सेवा कर म्हणत परत पाठवलं. तुम्हाला भारत मातेची सेवा करायची आहे," असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. "मी स्वत:ला श्रद्धेच्या बाबतीत कधी भावूक होत नाही. मात्र काही ठिकाणं अशी असतात की आपोआप आपण नतमस्तक होतो. असे एक स्थान या उच्च पदस्थ राजश्रीने दाखवलं तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराजांची आठवण झाली. त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं की निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी... आपल्याला आज एक श्रीमंत योगी प्राप्त झाला," असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी गोविंदगिरी महाराजांनी केलेलं छत्रपती शिवाजी महाराज संन्यास घेणार होते हे विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. "सन्माननीय गोविंदगिरी महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही," असं रोहित पवारांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती," असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी गोविंदगिरी महाराजांच्या भाषणाचा व्हिडीओही आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे.