Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात रोहित पवार (Rohit Pawar) यांची तब्बल 12 तास चौकशी झाली. 12 तासाच्या चौकशीनंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले. बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई होत असावी असं लोकांचं मत असल्याचं रोहित पवारांनी म्हटल.
बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी (Baramati Agro Money Laundering Case) ही चौकशी झाली. येत्या 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेतेही यावेळी उपस्थित होते. शरद पवार पळणा-यांच्या नाही, तर लढणा-यांच्या पाठिशी उभे राहतात, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. तर अजित पवारांना टोला लगावला.
आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. मुंबईतील बॅलार्ड पिअरच्या राष्ट्रवादी ऑफिसबाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडून त्यांनी ईडी कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अखेर खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर कार्यकर्ते मागे हटले. सत्य बोलणा-यांना ईडीकडून त्रास दिला जातोय अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलीय. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
निवडणुका आल्या की नवीन अधिका-यांच्या माध्यमातून हे कारवाया करतात. आम्ही एकत्र आहोत आणि याच्याविरोधात ताकदीनं लढा देऊ असं काँग्रेस नेते अतुल लोंढे म्हणालेत. रोहित पवारांच्या ईडी चौकशीसंदर्भात प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. मविआ सोबत असून एकत्र लढत असल्याचंही ते म्हणालेत. संवैधानिक संस्थानांच्या राजकीय वापराविरोधात उभं असल्याचंही ते म्हणालेत.
ईडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची शाखा असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय.. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर दुसरीकडे अजित पवारांवरही राऊतांनी निशाणा साधलाय.. अजित पवारांचा ईडीने छळ केला.. मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवारांना शांत झोप लागत असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ED ची छापेमारी
यापूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीनं छापेमारी केली होती.आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ED नं छापेमारी केली होती. पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. ईडीच्या पथकाने एकूण 6 ठिकाणी धाडसत्र राबवले होते. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली होती. त्याचसोबत रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड साखर कारखान्यावरही आयकर खात्याने छापे मारले होते.