नाशिकमध्ये दरोडा; गोळीबारात एकाचा मृत्यू

मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार

Updated: Jun 14, 2019, 02:28 PM IST
नाशिकमध्ये दरोडा; गोळीबारात एकाचा मृत्यू title=

नाशिक : नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नाशिकमध्ये भरदिवसा दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात घुसून पाच अज्ञातांनी गोळीबार करत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. 

दरोडा टाकण्याच्या हेतून तोंडावर काळा कपडा बांधून हे दरोडेखोर मुथूटच्या कार्यालयात आले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करत धोक्याचा अलार्म वाजवल्याने लुटारुंनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यामुळे या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र हल्लेखोरांनी घटना स्थळावरून पळ काढला होता. 

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत कमी होत चाललीय का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.