अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखचा रोड शो

रितेश देशमुखने आपले भाऊ अमित देशमुख यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

Updated: Oct 19, 2019, 06:08 PM IST
अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखचा रोड शो title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी अभिनेता-अभिनेत्रीच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. लातूर शहरातही अभिनेता रितेश विलासराव देशमुख याच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मोठे भाऊ आणि लातूर शहराचे काँग्रेस उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. 

लातूर शहरातील पूर्व भागातील विवेकानंद चौक, शाहू चौक, अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, हनुमान चौकमार्गे हा रोड शो करण्यात आला. या रोड शोमध्ये रितेशचे मोठे भाऊ काँग्रेस उमेदवार अमित देशमुख, यांच्या पत्नी अदिती अमित देशमुख यांची उपस्थिती होती. 

या रोड शोच्या माध्यमातून रितेश देशमुखने आपले भाऊ अमित देशमुख यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन  केले. लातूर शहरातील नागरिकांनी विशेषतः तरुणाईने रितेशच्या या रोड शोला मोठी हजेरी लावली होती. तर रितेशनेही हात दाखवत उपस्थित तरुणाईचा तसेच लातूरकरांच्या शुभेच्छाचा स्वीकार केला.