Wedding Invitation : सध्या सगळीकडेच लगीनघाई पाहायला मिळत आहे. त्यातच प्रत्येक जोडप्याला आपलं लग्न (wedding) खास व्हावं आणि कायम आठवणीत राहावं असं कायमचं वाटत असते. यासाठी प्री वेडिंग फोटोशूट पासून ते लग्नाच्या कपड्यांपर्यंत सर्व काही खास करण्याचा जोडप्याचा प्रयत्न असतो. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून लग्नपत्रिकाही बदललेल्या रुपात पाहायला मिळत आहे. काही अनोखा पत्रिकांना सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी देखील मिळते. अशातच कोल्हापुरच्या रांगड्या भाषेतील अशीच एक लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रिकेतील आशय पाहून ती कोणाची आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. तर ही पत्रिका आहे प्रसिद्ध आरजे सुमित याची (RJ Sumit).
घरच्यांच्या मागणीनंतर लग्नास होकार दिल्याचे सुमितने सांगितले. सुमितने लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी दोन पत्रिका छापल्या आहेत. "नातेवाईकांना देण्यासाठी एक पत्रिका ही नेहमीप्रमाणे छापण्यात आलीय. कोल्हापूरचा आरजे म्हणून अशी सोशल मीडियावर ओळख असल्याने दुसरी पत्रिका ही कोल्हापुरी भाषेत छापलीय. या भाषेने ओळख आणि प्रेम दिले आहे म्हणून त्या भाषेतच पत्रिका छापण्याचा विचार आला," असे आरजे सुमित सांगतो.
"यातील कंटेट हा मी स्वतः लिहीला आहे. पत्रिकेची डिझाईन करण्यासाठी चार जणांनी केलीय. पत्रिका सोशल मीडियावर टाकण्यापेक्षा व्हॉट्सअॅपवर टाकली. व्हॉट्सअॅपवरुन ही पत्रिका एवढी व्हायरल झाली की त्याचे स्क्रिनशॉर्ट माझ्यापर्यंत आला. मात्र लोक मला खरंच लग्न करणार आहेस का असेही विचारत आहेत. पण यावेळी खरंच माझे लग्न आहे," असेही सुमितने सांगितले.
दरम्यान, रविवारी 27 नोव्हेंबरला सुमित आणि श्वेता यांचे लग्न आहे. दुपारी एक वाजून तीन मिनीटांनी हे लग्न पार पडणार असल्याचे पत्रिकेत म्हटलं आहे. यासोबत लग्नाला येताना आहेर आणू नका फक्त तु्म्ही लग्नाला या असेही या पत्रिकेत म्हटलं आहे.