दोन पिल्लांना मारल्याचा अस्वलाकडून बदला; हल्ल्यात घेतला दोघांचा जीव

ती आई होती म्हणूनी...

Updated: Jun 12, 2020, 12:32 PM IST
दोन पिल्लांना मारल्याचा अस्वलाकडून बदला; हल्ल्यात घेतला दोघांचा जीव  title=

मयुर निकम, झी मीडिया,बुलढाणा :  ती आई होती म्हणूनी... आई आणि पिल्लाचं नातं हे अनोखंच असतं. आपल्या पिल्लावर कोणतंही संकट आलं तर ते आपल्या अंगावर घ्यायचं हे प्रत्येक आईचा पवित्रा. असंच काहीसं बुलढाण्याच्या सोनाळा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारात घडलं आहे. अस्वलीने जगंलात गेलेल्या दोन इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळापासून अगदी काही अंतरावर अस्वलाच्या दोन पिल्लांवर कुणीतरी कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने अस्वल चिडली असून तिने पिल्लांच्या हत्तेचा बदला म्हणून दोन इसमांवर हल्ला करून त्यांना ठार मारलं आहे.

जिल्ह्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र मध्ये हे गुरुवारी एका चीडलेल्या अस्वलीने जंगलात गेलेल्या दोघा इसमांवर  हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळाच्या लगतच अस्वलाच्या २ लहान पिल्लांना कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार केल्याने अस्वलाने चिडून या दोघांना ठार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारामध्ये गुरुवारी सकाळी अशोक मोतीराम गवते वय ५२ वर्षे आणि माना बंडू गवते वय ४२ वर्षे हे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गावात क्षेत्रातील आलेवाडी नियत क्षेत्रात मध्ये गेले असता त्यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अस्वलाने एका व्यक्तीच्या पूर्ण चेहरा छिन्न- विच्छिन्न केलेला होता. यामुळे सदर अस्वली ही चीडलेली असल्याचे  अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळाचा १५ ते २० फुटावर जवळच अस्वलीचे २ आठ महिन्याचे पिल्ले कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार केल्याचे अवस्थेत दिसून आले. यामुळेच मादा अस्वलाने जंगलात गेलेल्या व्यक्तींवर हल्ला चढवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वनविभागाच्या चमूने घटनास्थळी पोहचून पंचनामा करून आकोट व्याघ्र प्रकल्प मध्ये वन गुन्हा दाखल केला आहे. अस्वलाच्या पिल्लांची हत्या करून त्यांच्या नखांची तस्करी केली जात असते. यामुळेच त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.