बंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप

Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आहे.

Updated: Jun 30, 2022, 02:37 PM IST
बंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप  title=

पणजी, गोवा : Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने राज्यात सत्तास्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बंडखोर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट केले आहे. आता शपथविधी होत नाही तोवर बंडखोर आमदारांना गोव्यातच ठेवले जाणार आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना गोव्यात हजर राहण्यासाठी व्हीप बजावला आहे.

दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाचे सरकार राज्यात येणार आहे. तसे संकेत दोघांकडून देण्यात आले आहेत. ज्यांचा शपथविधी आहे त्यांनाच गोव्यातून मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अन्य बंडखोर आमदार हे गोव्यातच राहणार आहेत.

पहिल्या टप्प्यात काही जणांचाच शपथविधी होणार असून यावेळी शिंदे गटातून केवळ एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार. बंडखोर आमदारांची नाराजी टाळण्यासाठी सुरुवातीला केवळ एकनाथ शिंदे एकटेच शपथ घेतील,अशी माहिती आहे.

राजभवनवरच शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.  राजभवनवर पत्रकारांना आतमध्ये सोडले जाणार आहे. पोलिसांनी पत्रकारांना आयडी तयार ठेवण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने मोठी खेळी खेळली आहे. शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. गोव्यात हजर राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आला आहे. गटनेते एकनाथ शिंदे आणि प्रतोद भरत गोगावले यांनी हा व्हीप बजावला आहे.

एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.  सागर बंगल्यावर शिंदे - फडणवीसांची भेट होणार आहे.  गोव्यातून मुंबईत आल्यानंतर शिंदे-फडणवीस भेट होणार आहे, असे सांगितले जात आहे.  एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह दुपारपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर  पुढील राजकीय सत्ता समीकरणाबाबत चर्चा करणार आहेत. त्याआधी शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.