प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यातील पिरलोटे या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी जंगलात प्राण्यांची कत्तल करण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा याभागातील जंगलात प्राण्यांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले व पहाटेपासून मुंबई–गोवा महामार्ग रोखून धरला यावेळी ग्रामस्थ आणि पोलिस यांच्यात झटापट होऊन ग्रामस्थांनी गाड्याची मोडतोड करून पोलिसांची वाहने जाळली.
प्राण्यांची हत्या केल्याप्रकरणावरून खेडच्या पिरलोटे भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी तब्बल चार तास मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. महामार्गावर टायर जाळून महामार्ग दोन्ही बाजूची वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली होती. या परिसरात प्रण्यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे आज पहाटे पासूनच जमावाने मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यानंतर पोलीस आणि तहसीलदार आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी घटनास्थळी आले.मात्र त्याचवेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला करत पोलिसांची गाडी पेटवून दिली. त्यामुळे परीसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून रस्त्यावर असलेला जमाव अखेर 4 तासानंतर शांत झाला.. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
गेल्या काही दिवसांतल्या या परिसरातल्या प्राणी कत्तलीच्या घटनांबाबतच्या तक्रारी स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांनी संवेदनशीलता दाखवली असती तर कदाचित लोकांचा उद्रेक थांबवता आला असता. उलट प्राणी हत्येमुळे आंदोलन केलेले स्थानिकच आता आरोपी झालेत, तर मुळ आरोपी मोकाट आहेत.