रत्नागिरी : कोरोनाच्या लढ्यात आता रत्नागिरीकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जिल्हा आता लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. तसेच जे रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे रिपोर्टही निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे ही मोठी दिलासा देणारी घटना घडली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात असलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होताना दिसत आहे.
सहा महिन्यांच्या कोरोनाबाधित बाळाची तब्येत देखील सुधारत आहे. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील काही संशयितांचे जे काही स्वॅब पाठवण्यात आले होते, ते देखील आता निगेटिव्ह आले आहेत. दापोली, खेड़ या तालुक्यातील रुग्णांच्या स्वॅबचा यामध्ये समावेश आहे. या सर्व घटना जिल्ह्याच्यादृष्टीने चांगल्या आहेत. त्यामुळे काही दिवसात रत्नागिरी जिल्हा हा कोरोना मुक्त होईल, अशी शक्यता आहे. तसेच आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारीकलक्ष ठेवून आहे.
दिल्लीतील मरकज येथे गेलेल्या व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचं ३ एप्रिल रोजी स्पष्ट झाले होते. दरम्यान, या रूग्णाचे दोन्ही रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आणखी एक म्हणजेच तिसऱ्या रिपोर्टनंतर या रुग्णाला घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तर, सहा महिन्यांच्या बाळासाह उर्वरित दोन कोरोनाबाधित रूग्णांच्या प्रकृतीत देखील सध्या सुधारणा होत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. राजीवडा येथील एक तर, साखरतर या गावातील तिघांना कोरेनाची लागण झाली आहे. यामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काही खासगी डॉक्टरांनी सेवा बंद केली आहे. प्रशासनाने कारवाईचा इशारा देऊनही त्यांनी दवाखाने न उघडल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या डॉक्टरांवर कारवाई करु शकतो. मात्र डॉक्टर स्थानिक आहेत आणि अडचणीच्यावेळी त्यांनी आपल्याला मदत केली आहे. त्यामुळे गैरसोईमध्ये नागरिकांची सोय व्हावी, हे डॉक्टरांच्या मनातून आले पाहिजे आणि त्यांनी दवाखाने सुरु केले पाहिजेत, अशी अपेक्षा उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्ती केली.