रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं अखेर मनोमिलन

 देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनं वाद संपला.

Updated: Mar 18, 2019, 06:09 PM IST
रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं अखेर मनोमिलन title=

जालना : जालन्यात एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या नेत्यांचं मनोमिलन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनं हा वाद संपला. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत अर्जुन खोतकर यांनी अखेर माघार घेतली. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून त्यांनी माघार घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माघार घेत युतीसाठी लढू, जास्तीत जास्त जागा जिंकू, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही असे खोतकर यांनी म्हटले आहे. दानवेंच्या उमेदवारीला खोतकरांनी पाठिंबा दिला आहे. खूप कालावधी ताणल्यानंतर अर्जुन खोतकरांनी ही भूमिका घेतली आहे. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून संतप्त आहेत. ही जागा शिवसेनेकडेच यावी यासाठी कार्यकर्ते, स्थानिक नेते, अर्जुन खोतकर आग्रही होते.

जालना लोकसभा शिवसेनेने लढवली पाहिजे यासाठी अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. जालन्यातून लढण्यासाठी अर्जुन खोतकर ठाम होते. त्यामुळे दानवेंचा मार्ग सुकर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याने दानवेंचा मार्ग सुकर झाला आहे.