प्रजासत्ताक दिनानिमित्त रांगोळी प्रदर्शन

पूर्वेतल्या मोरया नगर भागात रांगोळी आणि पेंटिंगचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 28, 2018, 11:10 PM IST
प्रजासत्ताक दिनानिमित्त रांगोळी प्रदर्शन  title=

विरार : पूर्वेतल्या मोरया नगर भागात रांगोळी आणि पेंटिंगचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

प्रजासत्ताक दिन निमित्ताने षडांग आर्ट या ग्रुपनं, हे प्रदर्शन भरवलं आहे. 31 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत खुलं राहणार आहे. विरारमध्ये आयोजित रांगोळी आणि पेंटिंग प्रदर्शनातल्या कलाकृती पाहताना थक्क व्हायला होतं. थ्रीडी रांगोळी प्रकारामध्ये हितेन वैती या कलाकारानं कुत्र्यासोबत स्वतःचं साकारलेलं प्रतिबिंब पाहात रहावं असंच आहे. तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेट चाहते मिस करत असल्याची रांगोळी डोळ्यांचं पारणं फेडते. मच्छींद्र वैती या कलाकारानं ठिपकेदार कुत्र्याची साकारलेली रांगोळी नजर खिळवून ठेवते.

दुस-या रांगोळीत हातात तिरंगा घेऊन ऊभ्या असलेल्या चिमुकलीचा कुतुहलपूर्ण चेहेरा, आंघोळ करताना लहानग्याच्या चेह-यावरुन ओघळणारं पाणी आणि चेह-यावरचा निरागस भाव, स्त्रीयांवरचे वाढते अन्याय अत्याचार, तसंच स्त्रीयांना भोगाव्या लागत असलेल्या वेदनांचं रेखाटन पाहून, कलाकारांना दाद दिल्याशिवाय राहवत नाही. तर निसर्गचित्र रांगोळीत रेखाटलेली मगर, साप हुबेहूबच भासतात. हर्षद पाटील यांनी रांगोळीतले नविन प्रकार शोधून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी फोटो फ्रेम रांगोळी काढली आहे. 

 रांगोळी कलेतून हुबेहूब चित्रण रेखाटणारे कलाकार वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. इतर कलांना सरकार दरबारी मंच मिळाला आहे. रांगोळी कलाकारांनाही असा हक्काचा मंच मिळण्याची गरज आहे. जेणेकरुन रांगोळी कलाकारांनाही प्रतिष्ठा आणि हक्काचं उपजिविकेचं साधन मिळू शकेल.