Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात एक नविन राजकीय पक्ष स्थापन झाला आहे. राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या सख्या भावाने स्वत:चा पक्ष काढला आहे. शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या भावाने नविन पक्षाची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी महायुती सोबत जाण्याचा निर्णयही घेतला आहे.
शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. ज्योती मेटे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात आहेत. तर. ज्योती मेटे यांचे दीर आणि विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसंग्राम पक्षाशी फारकत घेऊन जय शिवसंग्राम संघटना रामहरी मेटे यांनी स्थापन केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती बरोबर जाण्याचा ठराव पुण्यात झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. त्याबाबतचा अधिकृत निर्णय येत्या २ दिवसात जाहीर करू अशी माहिती जय शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष रामहरी मेटे यांनी दिली. कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळावी तसचं दिवंगत नेते विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण व्हावीत ही आमची इच्छा आहे असंही ते यावेळी म्हणाले. ज्योतीताई मेटे यांच्याशी सध्या कुठली ही राजकीय चर्चा सुरू नसल्याच त्यांनी स्पष्ट केलं.
ज्योती मेटे बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. ज्योती मेटेंच्या उमेदवारीला वंचितनं पाठिंबा दिल्याचं समजतंय. प्रत्यक्षात ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून लढायला इच्छुक होत्या. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली... त्यामुळे ज्योती मेटे आता बीड लोकसभेची निवडणूक वंचितकडून लढण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.