पुणे : पुण्यातील राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांना आता लोकसभेचे डोहाळे लागलेत. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत पुण्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी अधिकृतपणे जाहिर केलंय. काकडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. गेल्या २ वर्षात आपण पक्षासाठी केलेल्या कामाच्या आधारावर आपल्याला पक्षाकडून निश्चितपणे उमेदवारी मिळेल असा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी पुण्यातील भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे तसेच लोकसभेसाठी गेल्या वेळ पासून इच्छुक असलेले गिरीश बापट यांना डावलून पक्ष काकडेंना संधी देणार का हा प्रश्न आहे.
याबाबत त्यांच्याकडून अद्यापर्यंत काही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आपल्याला संधी मिळाल्यास गेल्या वेळपेक्षाही अधिक मतांनी विजयी होऊ असा विश्वास काकडेंनी व्यक्त केलाय. दरम्यान आकड्यांचा जादुगार म्हणून प्रसिद्ध असलेले काकडे या निमित्तानं पुन्हा चर्चेत आले आहेत.