मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा - खासदार राजू शेट्टी

दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा, असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.  

Updated: Dec 25, 2018, 10:53 PM IST
मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा - खासदार राजू शेट्टी title=

नागपूर : स्वत: मरण्यापेक्षा दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा, असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. कार्यकर्त्यांना आपण तशा सूचनाच दिल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता संताप अनावर झालाय. त्यामुळे स्वत: मरण्यापेक्षा ठोकून काढणंच योग्य असल्याचे वक्तव्य शेट्टींनी केले. दौऱ्यावर आलेले मंत्री पैसा गोळा करण्याशिवाय काय करतात असा सवालही त्यांनी केला. 

साखरेचे उत्पादन जास्त झाले तरी सरकार रडत का बसत आहे, असा प्रश्न उपस्थित करत राजू शेट्टी यांनी पुढील काळात स्वाभिमानी शेतकरी पक्ष तीव्र आंदोलन करणार आहे, असे स्पष्ट केले. दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांचे कपडे काढा आणि ठोकून काढा, अशी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी काळातील आंदोलनाची भूमिका राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकार का रडत आहे?

आता आमचा संताप अनावर झाला आहे. मरण्यापेक्षा आम्ही यांनाच ठोकून काढावे हे जास्त योग्य असल्याचे ते यावेळी बोलले. तसेच दौऱ्यावर आलेले मंत्री पैसा गोळा करण्याशिवाय काही करत नाही, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. जिथे आंदोलन जास्त होते त्या भागात सर्वात जास्त चांगले चालणारे कारखाने आहेत. विदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच आंदोलन होत नाही. त्यामुळे इकडे सर्वात जास्त ऊस कारखाने बंद किंवा तोट्यात आहेत. त्यामुळे आंदोलन आणि ऊस कारखाने चालणे याचा काही संबंध नाही. ऊस कारखाने सर्वाधिक कर आणि रोजगार देतात. साखरे पेक्षा इथेनॉल तयार करायला आजकाल सांगण्यात येत, मात्र इथेनॉल कुणी घेत नाही. साखरेचे उत्पादन जास्त झाले तर सरकार रडत का बसते, असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

या सात जागांवर लक्ष केंद्रीत

भाजप विरुद्ध महाआघाडी व्हावी, अशी चर्चा सुरु आहे. मात्र भाजपला हरवूंन काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत आणा असे विचार ठेऊन महाआघाडी होऊ शकत नाही. छोट्या पक्षांची मोट बांधली तर महाआघाडी राज्यातील ४० लोकसभेच्या जागा जिंकू शकते, असे राजू शेट्टी यावेळी बोलले. लोकसभा निवडणुकीसाठी  हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, धुळे, माढा, बुलडाणा आणि वर्धा या ७ जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.