अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : महापालिका निवडणुकीत झालेली पडझड सावरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. झालं गेलं मागे सोडून पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा त्यांचा यानिमित्ताने प्रयत्न आहे.
गेल्यावर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीपूर्वीच मनसेचं भवितव्य कळून चुकलं होतं. मात्र जे अपेक्षित होतं त्याहीपेक्षा मोठा धक्का पक्षाला पुण्यात बसला. पुणे मनपातला मनसेचा नगरसेवकांचा आकडा २९ वरून थेट २ वर आला.
पक्षातील दिग्गजांनादेखील या निवडणुकीत धूळ चाखावी लागली. गलितगात्र म्हणावी अशीच अवस्था या निवडणुकीनंतर मनसेला आलीय. दरम्यानच्या काळात शहराध्यक्षांची संख्या दोनावरून एकवर आणणे, नको असलेल्या काहींना घरी बसवणं अशा काही गोष्टी घडल्या.
अधूनमधून पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. शहर पातळीवर जमेल तशा पद्धतीनं पक्ष चालवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून सुरु आहे. तरीदेखील त्यात म्हणावा तसा उत्साह दिसला नाही.
या सगळ्या पार्शवभूमीवर तब्बल ६ महिन्यांनी का होईना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुण्यातील परिस्थितीची जाणीव झालीय. पुण्यातील विभाग तसेच शाखा स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते पुण्यात आले आहेत.
सलग २ दिवस हा बैठकांचा कार्यक्रम चालणार आहे. त्यानंतर संघटनेतील रिक्त जागांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. निवडणुकीतील पराभवानंतर रिकामपण आलेल्या माजी नागसेवकांवर नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
खरंतर पक्षाला आधीपासूनच गळती लागली होती. सध्या कुठल्या निवडणुका नसल्यानं आऊटगोईंग थांबलंय. त्यामुळे जे पक्षात आहेत त्यांना निष्ठावान समजून सक्रिय केलं जाणार आहे. संघटनात्मक दृष्टिकोनातून ही एकप्रकारे पक्षाची पुनर्बांधणीच म्हणावी लागेल.