राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लान

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.

वनिता कांबळे | Updated: Aug 5, 2024, 09:44 PM IST
राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लान title=

Raj Thackeray : विधानसभा रणसंग्रामाआधी मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढताहेत. लोकसभेला मोदींना पाठिंबा देणा-या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी 'एकला चलो'चा नारा दिलाय.  राज ठाकरेंनी यापुढे जात मनसेच्या २ उमेदवारांची नावं घोषित करून पहिला डाव टाकलाय. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय.

शिवडीमधून मनसेनं बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवलंय. शिवडीत सध्या शिवसेना ठाकरे पक्षाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. इथं महायुती कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बाळा नांदगावकर कोण आहेत?

छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पोटनिवडणुकीत भुजबळांचा पराभव केल्यानं जायंट किलर म्हणून पुढे आले. शिवडीमधून आमदार म्हणून निवडून आले.  राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून मनसेत कार्यरत. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. 

कोण आहेत दिलीप धोत्रे ? 

पंढरपूरमधून मनसेनं दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केलीय. पंढरपूरमध्ये सध्या भाजपचे समाधान आवताडे विद्यमान आमदार आहेत. इथं मविआकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शाखा प्रमुख ते मनसेचे राज्याचे नेते असा त्यांचा प्रवास आहे.  विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांचे समर्थक आहेत.  त्यांनतर तालुका पातळीवर शिवसेना पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.  राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर त्यांच्यासोबत राहिले.  सोलापूर जिल्हा संघटक पदावर काम केले.  सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत.  छत्रपती संभाजीनगरमधील राज ठाकरे यांची सभा यशस्वी केली होती.  2009 साली पंढरपूर विधानसभा मनसेकडून लढवली होती. 
शिवडी आणि पंढरपूरपाठोपाठ वरळीमधून मनसेकडून संदीप देशपांडेंची वर्णी लागणार असल्याचंही जवळपास निश्चित मानलं जातंय. सोलापुरात पदाधिका-यांसोबत बोलताना राज ठाकरे यांनी तसे संकेतच दिलेत. गेल्या काही दिवसांपासून मनसेनं वरळीवर लक्ष केंद्रित केलंय. नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज ठाकरेंनी वरळीतील नागरी समस्यांवर चर्चा केली होती. त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या वरळीच्या गडाला राज ठाकरेच सुरुंग लावणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.