औरंगाबाद : कोरोनाचं नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवतंय असा आरोप मनसे नेते राज ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात एकही जण कोरोनामुळे दगावलेला नसतांना नाशिकमध्ये कलम १४४ कशासाठी लावलं, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
दरवर्षी महाराष्ट्रात दीड लाख लोक टीबीने मरतात, त्याचं काही नाही असंही राज ठाकरे म्हणाले. कोरोनामुळे महापालिका निवडणुकाही पुढे ढकलणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार असून शिवपूजन देखील केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला अजून प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसली, तरी परवानगी मिळेल अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रामध्येही कोरोना व्हायरसची एन्ट्री झाली आहे. पुण्यातल्या ८ आणि मुंबईतल्या २ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जायची आवश्यकता नाही. राज्यात सापडलेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.