Uddhav Thackeray Group Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील या मोठ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच उद्धव ठाकरे गटाने दिल्लीत झालेल्या राज आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीचा संदर्भ देत पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला आहे. राज ठाकरेंनी काही काळापूर्वी उपस्थित केलेल्या पुलवामासंदर्भातील शंका अमित शाहांनी दूर केल्या असतील असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
"पुलवामा हल्ल्याआधी बँकॉकमध्ये अजित डोवाल आणि पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची गुप्त बैठक का झाली? असा प्रश्न राज ठाकरे यांना बराच काळ पडला होता. त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ होते. पुलवामात 40 जवानांचे हत्याकांड झाले त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे व 2019 च्या निवडणुकीआधीच हे हत्याकांड कसे घडले, याविषयी त्यांच्या मनात असंख्य प्रश्नांची घालमेल सुरूच होती. परवाच्या मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटल्यावर पुलवामातील हत्याकांडाबाबत राज ठाकरे यांच्या मनात वादळ निर्माण करणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील व हर्षवर्धन पाटलांप्रमाणे त्यांनाही शांत झोप लागली असेल, याविषयी कुणाच्या मनात शंका नसावी," असा टोला ठाकरे गटाने राज ठाकरेंना लगावला आहे.
"पुलवामात 40 जवानांचे हत्याकांड झाले. त्या हत्याकांडासाठी लोकसभा निवडणुकांचा मोसम निवडला गेला. जम्मू-कश्मीरमध्ये तेव्हा सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. केंद्र सरकारच्या बेफिकिरीमुळेच 40 जवानांना प्राण गमवावे लागले. याबाबत अनेक स्फोटक खुलासे मलिक यांनी केले. अत्यंत धोकादायक व संवेदनशील रस्त्यावरून जवानांची वाहतूक करू नये, त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे जवानांना प्रवासासाठी केंद्राने विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणी राज्यपालांनी केली. ही मागणी धुडकावण्यात आली व पुढच्या प्रवासात आपल्या 40 जवानांचे हत्याकांड आरडीएक्स स्फोटात झाले. 400 किलो आरडीएक्स लादलेली गाडी इतक्या चौक्या-पहारे पार करून जवानांच्या बसवर आदळतेच कशी? हा पहिला प्रश्न व आरडीएक्स भरलेल्या गाडीचे रजिस्ट्रेशन कोणत्या राज्याचे होते? हा दुसरा प्रश्न. गाडीचे रजिस्ट्रेशन गुजरात राज्याचे होते हे समोर आले. मग ही गाडी पुलवामापर्यंत सहज पोहोचलीच कशी? हा तिसरा महत्त्वाचा प्रश्न. पुलवामा हल्ल्याच्या बाबतीत सखोल संशोधन करू पाहणारे देशाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत यांचाही नंतर संशयास्पदरीत्या अपघाती मृत्यू झाला. अत्यंत सुरक्षित अशा लष्करी हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करीत होते व त्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. पुलवामा हत्याकांडातील अनेक रहस्ये रावत यांच्याबरोबरच संपविण्यात आली काय? असा प्रश्न तेव्हा देशवासीयांना पडला, तसा राज ठाकरे यांनाही पडला असावा," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
नक्की वाचा >> वसंत मोरेंचं थेट भाजपाला चॅलेंज! पुणेकरांचा उल्लेख म्हणाले, 'माझ्या उमेदवारीने काय...'
"पुलवामा हत्याकांडात बळी पडलेल्या 40 जवानांविषयी राज ठाकरेंच्या मनात संवेदना होती हे नक्कीच. तसे नसते तर पुलवामा हत्याकांडामागचे नवे रहस्य त्यांनी भरसभेत जाहीर केले नसते. पुलवामा हल्ल्याआधी अजित डोवाल व पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बँकॉक येथे का भेटले? हा राज यांचा सवाल धक्कादायक होता आणि आहे. त्या प्रश्नाचे उत्तर कालच्या दिल्लीतील ग्रेट भेटीत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मिळाले असेल तर राज यांनी ती माहिती सार्वजनिक करायला हवी. राष्ट्रहितासाठी ते महत्त्वाचे आहे. योगायोग म्हणा किंवा आणखी काही, पण पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी संबंधित एका कंपनीने भरमसाट निवडणूक रोख्यांची खरेदी करून ते दान भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले आहे," असा संदर्भ लेखात जोडण्यात आला आहे.
"हत्याकांडात बलिदान दिलेल्या जवानांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार अमानुष आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्य मार्गावर आपल्या सशस्त्र जवानांना घेऊन जाणाऱ्या 78 वाहनांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे उत्तराखंडच्या ‘जिम कॉर्बेट’ जंगलात एका शूटिंगमध्ये आत्ममग्न होते. सुरुवातीला त्यांनी कोणतीच कठोर प्रतिक्रिया दिली नाही. ‘जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही,’ वगैरे श्रद्धांजली अर्पण केली, पण लगेच लोकसभा निवडणुकीदरम्यान पुलवामातील हत्याकांड व जवानांच्या बलिदानाचा राजकीय प्रचार करून लोकांना भाजपला मते देण्याचे भावनिक आवाहन केले. मोदी त्यात आघाडीवर होते. प्रचारादरम्यान जवानांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम घेतले व त्याच 40 जवानांच्या बलिदानावर निवडणुका जिंकल्या. 2019 मध्ये मोदी व भाजपची स्थिती बरी नव्हती. भाजप जेमतेम 200 जागाच जिंकेल असेच वातावरण होते, पण अचानक भारतीय सशस्त्र जवानांचे हत्याकांड पुलवामात घडले व भाजपने त्याचे राजकीय भांडवल करून मते मागितली. पुलवामा हत्याकांड हा आंतरराष्ट्रीय कट होता, की भारतातील राजकीय व्यापारी पक्षांची ती एक निवडणूक जिंकण्याची अमानुष स्ट्रटेजी होती? जे सरकार आपल्याच जवानांचे आपल्याच भूमीवर रक्षण करू शकत नाही, ते सरकार युद्ध काळात देशाचे संरक्षण कसे करणार?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> 'स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट...'; मोदी-शाहांचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल
"मोदी हे 2019 च्या प्रचारसभांतून पुलवामा हत्याकांडात बळी पडलेल्या जवानांबद्दल नकली अश्रू ढाळत होते, पण निवडणुका जिंकताच मोदी व त्यांचे सरकार पुलवामाचे हत्याकांड, बलिदान विसरले; पण सत्यपाल मलिक यांनी पुलवामा स्फोटामागचा खरा ‘स्फोट’ घडवून जगात खळबळ उडवली. त्यामुळे मलिक यांच्या घरावर ईडी-सीबीआयच्या धाडी पडल्या, पण मलिक घाबरले नाहीत. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जेम्स बॉण्ड म्हणून ओळखले जाते. पुलवामा हल्ल्याआधी पाकिस्तानचे त्यांचे समकक्ष व हिंदुस्थानचे ‘जेम्स बॉण्ड’ यांच्यातील गुप्त भेटीचे रहस्य काय? असा राष्ट्रहिताचा, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न राज ठाकरे यांनी तेव्हा विचारला होता. या टोकदार प्रश्नाचे खरे उत्तर अमित शहा भेटीत त्यांना मिळाले असेल. भारतीय प्रजासत्ताक, स्वातंत्र्य मोदी-शहा फासावर लटकवत असल्याची खंतदेखील राज यांनी व्यक्त केली होती. तो फासाचा दोर शहा यांच्या कार्यालयातून जप्त करून राज यांनी महाराष्ट्रात आणला असेल. एकंदरीत घाबरलेले मोदी-शहा त्यांच्या हुकूमशाहीची पकड अधिक मजबूत करू पाहत आहेत," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.