पोलादपूर बस अपघात : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची मस्करी सुरु होती अन् होत्याचं नव्हतं झालं

मज्जा-मस्करी सुरु होती आणि कोणाला कळायच्या आत मिनीबसला भीषण अपघात झाला. बस ५०० ते ८०० मीटर दरीत जाऊन कोसळली.

Updated: Jul 28, 2018, 04:51 PM IST
पोलादपूर बस अपघात : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची मस्करी सुरु होती अन् होत्याचं नव्हतं झालं title=

रायगड : दापोली येथून सकाळी कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी महाबळेश्वरला मिनीबसमधून निघाले होते. दापोली ते पोलादपूर असा प्रवास चांगला झाला. बसमध्ये सर्वजण मज्जा-मस्ती करत होते. कोणी गाणी म्हणत होते. दरम्यान, बस आंबेनळी घाटात आली. त्यावेळी निसर्गाचे दृश्य सर्वजण डोळ्यात साठवत होते. त्याचवेळी मज्जा-मस्करी सुरु होती आणि कोणाला कळायच्या आत मिनीबसला भीषण अपघात झाला. बस ५०० ते ८०० मीटर दरीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण सुदैवाने बचावला.

आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं

या अपघातात दैव बलवत्तर म्हणूनच कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी प्रकाश सावंत-देसाई बचावलेत. ते धक्क्यातून बाहेर आले आणि त्यांनी स्वत:ला सावरत दरी चढून वर आलेत. त्यानंतर अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर मदत कार्यासाठी हालचाली सुरु झाल्यात. मात्र, त्यापूर्वीच ३३ जणांवर काळाचा घाला घातला. या अपघातात जागीच ३३ जण मृत्यू पावलेत. दरम्यान, या अपघाताचे कारण अधिकच अस्वस्थ करणारे आहे. मिनीबस चालक केवळ क्षणभरासाठी मागे पाहिले आणि कोणाला काही कळायच्या आत बस दरीत कोसळली आणि सगळ संपलं.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दरवर्षी शेतीची कामे झालीत की ( लावणी) पिकनिक काढतात. आज शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चालकासह ३४ जण वर्षासहलीला निघाले होते. दोन दिवस धम्माल-मस्ती करण्यासाठी सगळेच उत्सुक होते. त्यांनी ग्रुप शेल्फी फोटोही काढला. त्यानंतर मिनीबस महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाली. परंतु, नियतीने सगळे काही हिरावून घेतले.

आंबेनळीच्या भीषण अपघातातून वाचलेला हाच तो 'एकमेव' प्रवासी

दापोली ते पोलादपूर असा चांगला प्रवास झाला. जस जसा घाट चढू लागलो त्यावेळी बसमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. आपण महाबळेश्वरला धम्माल करायची हा विषय सुरु होता. चेष्टा-मस्करी करत करत प्रवास सुरू होता. तेव्हा, बस चालकाने सहज मागे बघितले आणि बस रस्ता सोडून मातीवर गेली. त्यावेळी चालकाने ब्रेक मारला. मात्र, ओल्या मातीवरुन गाडी घसरत जाऊन दरीत कोसळली, अशी माहिती या अपघातात सुदैवाने वाचलेले प्रकाश सावंत-देसाई यांनी कथन केली.

प्रकाश सावंत-देसाई हे कृषी विद्यापीठात साहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बस दरीत कोसळत असताना प्रकाश सावंत-देसाई दारातून बाहेर फेकले गेले. झाडाच्या आधाराने ते बचावले आणि त्यानंतर फांद्यांना धरुनच साधारण ३० मिनिटानंतर दरीतून वर रस्त्यावर आलेत. घाटातील वाहनांना अडवून त्यांनी अपघाताची माहिती दिली आणि कृषी विद्यापीठातील वरिष्ठांनाही घडलेली घटना सांगितली. त्यानंतर मदतीसाठी हालचाली सुरु झाल्यात. मात्र, त्यापूर्वी ३३ जणांनी जगाचा निरोप घेतला होता. आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके मृतांचा शोध घेत आहेत.