Maharashtra Political News : कॉंग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेनिमित्त (Bharat Jodo Yatra in Maharashtra) सध्या महाराष्ट्रात आहेत. राहुल गांधी यांची विदर्भात पोहोचली आहे. बुधवारी भारत जोडो यात्रेला वाशीम जिल्ह्यातील जांभरुण परांडे येथून सुरुवात झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारण तापलं आहे. यानंतर राहुल गांधी यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले. झी 24 तासने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी एका सावरकरांच्या एका पत्राचा पुरावा दिला.
"गेल्या आठ वर्षांपासून भारतात भीतीचे वातावरण आणि हिंसा पसरवली जात आहे. भाजपचे नेते शेतकरी आणि तरुणांसोबत बोलत नाहीत. कारण जर ते त्यांच्यासोबत बोलले असते तर त्यांना शेतकरी, तरुणांना समोरचा रस्ता दिसत नाहीये. बेरोजगारी, महागाई वाढत आहे. याच्या विरोधात उभे राहण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेची गरज नाही असे वाटत असेल तर लाखो लोक यामध्ये सहभागी झाले नसते," असे राहुल गांधी म्हणाले.
"सावरकरांचे पत्र आहे. यामध्ये मला तुमचे सेवक व्हायचे आहे असे मी नाही सावरकरांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. तुम्हाला भारत जोडो यात्रा थांबवायची असेल तर थांबवा. सरकारला वाटत असेल तर त्यांनी भारत जोडो यात्रा थांबवून दाखवण्याचा प्रयत्न करावा," असे राहुल गांधी म्हणाले.
"एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली," अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी केली होती.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बोलताना उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत भाष्य केले. "राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतिव प्रेम, निष्ठा, आदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केला. हालअपेष्टा सोसल्या. तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आता गरज आहे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.