पुणे : पुण्यातील एका तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून येथील राजकारण चांगलेच तापले आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. मात्र, त्या पीडित तरुणीने चित्रा वाघ यांनीच मला गोव्यात डांबून ठेवले होते असे सांगत या सर्वांमागे चित्रा वाघ असल्याचा आरोप केला होता.
रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेणार असून चित्रा वाघ यांच्याबद्दलची भूमिका दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचे सांगत त्या पिडीत तरुणीने खळबळ माजवून दिली होती. हे प्रकरण इथेच संपेल असे वाटत असतानाच त्या पीडित तरुणीने नवा आरोप केला आहे.
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी शिवसेना नेता रघुनाथ कुचिक यांच्याकडून दबाब येत असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. हा गुन्हा मागे न घेतल्यास शरीर संबंधांचे व्हिडीओ व्हायलर करण्याची धमकी देण्यात येत आल्याचा आरोपही तिने केलाय.
रघुनाथ कुचिक याने आपल्या काही मित्रांमध्ये काही व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच, रघुनाथ कुचिक याचा मित्र ऍड. अतुल शिंदे, राहुल बोहरा यांनी बंदुकीचा धाक दाखवत समजुतीच्या करारनाम्यावर जबरदस्तीने सह्या घेतल्या असंही या तरुणीने म्हटलंय.
कुचिक यांची मुलगी आणि कुचिक याला मदत करणारे सतीश दादर, राहुल गोयल, प्रवीण साळवी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करणार असल्याचं या पीडित तरुणीनं म्हटलंय. तसेच, या पीडित तरुणीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई मेल करून मदतीची मागणी केल्याचंही त्या तरुणीनं सांगितलं.