धुळे : येथील प्रचार सभेत बोलून न दिल्याने शिवसैनिक आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. तर कणकवलीत भाजप-महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यात तुफान हाणामारी, तर कोल्हापुरात शिरोळच्या गुरूदत्त कारखान्यातील सभेत राडा पाहायला मिळाला.
धुळे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं घेतलेल्या प्रचारसभेत मंचावरच शिवसैनिकांमध्ये हाणामारी झालीय. पावकमंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे यांच्या प्रचारसभेनंतर सभेत बोलू न दिल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. मात्र हा वाद हातघाईवर आला आणि मंचावरच हाणामारी सुरू झाली. सभेत बोलू दिले नाही म्हणून मद्यपींनी नशेत मंचाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी काही शिवसैनिक धावले.
मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इसमांनी थेट माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. अखेर शिवसैनिकांनी मद्यधुंद इसमांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. सभेला आलेल्या जनतेसमोरच मंचावर तब्बल अर्धा तास हा राडा सुरू होता. त्यामुळे जनतेचंही अॅक्शन लोडेड ड्रामा पाहून मनोरंजन होत होतं. अखेर सभेला जमलेल्या नागरिकांनीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.