पुणे : पुण्याच्या तुळशीबाग राममंदिरातील मुर्तीच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने गाभाऱ्यात प्रवेश करून राम, लक्ष्मणाच्या पायातील चांदीची वाळी लंपास केली होती. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विश्राम बाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुळशीबाग राम मंदिर हे पुण्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. त्यात चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली होती.
तुळशीबाग येथील राम मंदिरात चोरीची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती, याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत होता. तो आरोपी वाघापूर येथील एका हॉटेलमध्ये आहे कामाला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन सासवड पोलीस स्टेशनचे हवालदार चांदगुडे व आरडे यांनी त्याला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी तोच असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडून चोरी केलेला एक मोबाईल फोन जप्त केला. देवाचे चोरलेले दागिने त्याने त्याच्या बहिणीकडे पुणे येथे ठेवल्याचे सांगितले. तपास विश्रामबाग पोलिस स्टेशनचे पोलीसांकडे असल्याने त्यांना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथील पोलिसांनी सासवडला येऊन आरोपीला सुपूर्त केले. या घटनेतील अधिक तपास विश्रामबाग पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.