सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : घर रिकामं करावं या किरकोळ कारणासाठी रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्याच साठ वर्षीय जन्मदात्या आईचा खून केला (son kills mother). धक्कादायक बाब म्हणजे आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करुन ते नदीत फेकले. या सर्व प्रकारात मुलासह नातवाचाही समावेश होता असे पोलीस तपासात उघड झालं आहे.
कशी केली हत्या?
क्राइम पेट्रोल व दृश्यम चित्रपट (Drishyam) पाहून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या वीस वर्षीय मुलाला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 5 ऑगष्ट रोजी हा सर्व प्रकार घडला असून पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. आरोपीने आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तब्बल नऊ तुकडे वेगवेगळ्या पिशवीत भरुन मुळा-मुठा नदीत फेकून दिले.
पोलिसनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वृद्ध महिला ही देहुरोड येथील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होती. तर मृत पतीही वानवडी परीसरातील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होते. या कामातून मिळणाऱ्या पैशातून पिडीत महिलेने मुंढवा परिसरात दीड गुंठे जागा खरेदी करत तिथे घर बांधले होते. पिडीत महिलेला तीन मुली व दोन मुले असा परिवार होता. या प्रकरणातील संशयित आरोपी मुंढवा येथे राहण्यास आहे.
घर खाली करावे यासाठी गेल्या काही दिवसांपासूनन, मुलाने आणि त्याच्या कुटुंबियांनी आईकडे तकादा लावला होता. आरोपी आईला त्रासही देत होता. ऑगस्ट महिण्याच्या पहिल्या आठड्यात घर खाली करावं यासाठी मुलगा व त्याचे कुटुंबिय मारहाण करत असल्याची तक्रार महिलेने मुलीकडे केली होती. याबाबत कळताच मुलगी पाच ऑगस्ट रोजी महिलेच्या घरी गेली. मात्र तिथे आई नसल्याने भावाकडे आणि त्याच्या मुलाकडे याबाबत चौकशी केली.
मात्र दोघांनीही दमदाटी करुन मुलीला व तिच्या नवऱ्याला हाकलून दिले. घरातून बाहेर पडतांना मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आल्याने मुलीला काही तरी घडल्याची शंका आली. यासंदर्भात मुलीने नातेवाईक व घराजवळी लोकांकडे अधिक चौकशी केली. त्यानंतर मुलीने मुंढवा पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात मुलाने साठ वर्षीय जन्मदात्या आईचा खून करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.
पोलिसांनी आरोपीच्या आईच्या मृतदेहाच्या नऊ तुकड्यापैकी काही तुकडे विविध ठिकाणाहून पिशवीसह ताब्यात घेतले आहेत. तर उर्वरीत तुकडे शोधण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे. काही नागरीकांनी नदीपात्रात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिसून आल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ते ताब्यात घेतले.
दरम्यान, दोन्ही मांजरी गावांना जोडणाऱ्या नदी पात्रावरील पुलावरुन मृतदेहाच्या पिशव्या नदीत टाकल्याची कबुली या प्रकरणातील संशयित आरोपी व त्याच्या मुलाने पोलिसांना दिली आहे