Pune porsche accident : पुणे कार अपघातामधल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) डॉ. अजय तावरेला अटक करण्यात आलीय. रजेवर असतानाही आपल्या सहकारी डॉक्टरकडून अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल (Blood Sample) बदलून टाकल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय. हे ससून रुग्णालय (Sassoon Hospital) आहे की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? असा सतंप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. दारू पिऊन दोन जणांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतलीय, हे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांसह हॉस्पिटलचीही न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
डॉ. तावरेची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी लिहिलं होतं. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय. डॉ. अजय तावरे गेली 15 वर्ष ससूनमध्ये काम करतायत. मग त्यांची बदली का होत नाही. तावडेंचा नेमका गॉडफादर कोण असे सवालही विरोधकांनी केलेत. ससूनमधल्या कारनाम्यांची यादीही प्रचंड मोठी आहे. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचार देण्यापेक्षा आपल्या गैरकारभारांमुळे ससून रुग्णालय सर्वाधिक चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाने ससून रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला होता.
ससून गेट वेल सून!
ड्रग्जमाफिया ललित पाटीलला ससूनमध्येच VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप झाला होता. ड्रग्ज तस्करी प्रकरणात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या ललित पाटीलने ससूनमधून पळ काढला होता. ससूनच्या कॅन्टीन मधून अमली पदार्थांची विक्री होत असल्याप्रकरणी कॅन्टीनमधील कामगाराला अटक करण्यात आली होती. ससून रुग्णालयात किडनी रॅकेट चालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप तावरेवरच झाला होता. ससून रुग्णालयामध्येच आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
दरम्यान, उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी याच डॉ. तावरेवर निलंबनाची कारवाई झाली होती. दारु ढोसून बेदरकार कार चालवत दोघांना चिरडल्याचा त्या अल्पवयीन पोराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी ब्लड सॅम्पल महत्त्वाचा पुरावा होता. मात्र निलंबनाची कारवाई होऊनसुद्धा याच तावरेची मजल चक्क अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकण्यापर्यंत गेलीय. त्यामुळे ससून रुग्णालयाची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली गेलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.