पुणे अपघातानंतर अजित पवारांचे पोलीस आयुक्तांना अनेक कॉल्स, फोन अटकेसाठी की वाचवण्यासाठी?

Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी तपासात नवनवे खुलासे होत आहेत. आता अटकेतील डॉक्टरांसोबत असलेल्या नर्सही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात. या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. 

निलेश खरमारे | Updated: May 30, 2024, 03:02 PM IST
पुणे अपघातानंतर अजित पवारांचे पोलीस आयुक्तांना अनेक कॉल्स, फोन अटकेसाठी की वाचवण्यासाठी? title=

Pune Porsche Accident : पुणे अपघातानंतर पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी (Ajit Pawar) मल्टिपल कॉल्स केले. अजित पवारांनी आयुक्तांना (Pune Police Commissioner) फोन कशासाठी केले होते हे आयुक्तांनी उघड करावे. आयुक्तांना फोन आरोपीला वाचवण्यासाठी होता की त्याच्या अटकेसाठी होता...? असा सवाल विचारत अग्रवाल कुटुंबियांशी (Agrawal Family) त्यांचे काय संबंध आहेत ते लवकरच समोर येईल. दोन दिवसांत सगळे पुरावे बाहेर काढणार असा इशारा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी दिला आहे. तसंच अंजली दमानिया यांनी अजित पवारांना नार्को टेस्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान स्विकारत अजित पवार यांनी आपल्यावरील आरोप सिद्ध झाले नाही तर दमानियांनी संन्यास घेऊन कायमचं घरी बसावं असं प्रतिआव्हान दिलं होतं. यावर अजितदादांचं हे आव्हान दमानियांनीही स्वीकारलं. मला हे पूर्णपणे मान्य आहे.. तुम्ही नार्को टेस्ट कधी करणार हे कळवा, निर्दोष ठरलात तर मी पूर्णपणे घरी बसेन असा टोला दमानियांनी लगावलाय.

अल्पवयीन आरोपीच्या आईची चौकशी
दरम्यान, कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईची देखील चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात ड्रायव्हरला धमकी देऊन पुरावा नष्ट करणं तसंच ससून मधील डॉक्टरांना पैसे देऊन रक्त नमुने बदलण्यात आल्याचं निष्पन्न झालंय. त्यावरून अल्पवयीन आरोपीचा वडील आणि आजोबा दोघांनाही  अटक करण्यात आलीये. या प्रकरणात मुलाच्या आईची काही भूमिका आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुलाच्या आईला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मोबाईल बंद असल्याचं उघडकीस आलं आहे.

ससूनमध्ये खासगी लोकांचा प्रवेश
ब्लड सॅम्पल घेण्यासाठी चक्क ससून रुग्णालयात खाजगी लोकांनी प्रवेश केला होता अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. अल्पवयीन तरुणाचे ब्लड घेताना त्या 4 व्यक्ती कोण होत्या? याचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केला जातोय.. रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून 4 व्यक्तींचा शोध घेतला जातोय. ब्लड घेताना ससून रुग्णालयाबाहेरील लोकांनी आत येऊन ब्लड सॅम्पल बदलल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ससूनमध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सॅम्पल घेतले होते. मात्र, ऐनवेळी आलेल्या व्यक्तींनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे त्या 4 व्यक्ती कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालयात आल्या होत्या...? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? याचा तपास केला जातोय.

पुणे कार अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी एका महिलेचे आणि 2 प्रौढ व्यक्तींच्या ब्लडचे सॅम्पल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आरोपीला वाचवण्यासाठी डॉ. हळनोरने हा कारनामा केल्याचं अहवाल चौकशी समितीने दिलाय. श्रीहरी हरनोलने 19 मे रोजी MLC तपासणी आणि ब्लड सॅम्पल घेताना नियमाचे पालन केलं नसल्याचं चौकशी समितीने म्हटलंय. त्यामुळे ती महिला आणि प्रौढ व्यक्ती कोण होत्या...? बदललेलं ब्लड कुणाचं होतं...? याचा तपास केला जातोय...

प्रकरणात नर्सची एन्ट्री
ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणात आता नर्सची एन्ट्री झालीय. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरसोबत असलेल्या दोन नर्सची पोलिसांकडून चौकशी करण्यात येतेय. डॉ. तावरे, हळनोर आणि शिपाई घटकांबळेची पुणे गुन्हे शाखेकडून पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी सुरुय. त्यांच्यासोबत या नर्सकडूनही अधिक माहिती घेण्यात येतेय.

दोषींना सोडणार नाही
पुणे अपघात प्रकरणी कुणालाही सोडणार नाही. इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा पर्दाफाश करणार, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. पुणे अपघात प्रकरणी योग्य तपास सुरू असून, दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती फडणवीसांनी दिलीय...