पुण्यातील बाजारपेठेत दोघांची फ्री स्टाइल हाणामारी; कारण ठरला 'टोमॅटोचा भाव'

Tomato Price Hike Pune: टोमॅटोचा भाव विचारला म्हणून ग्राहक आणि विक्रेत्यात मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 9, 2023, 04:33 PM IST
पुण्यातील बाजारपेठेत दोघांची फ्री स्टाइल हाणामारी; कारण ठरला 'टोमॅटोचा भाव' title=
pune news The customer and the seller were beaten up for asking the price of tomatoes

पुणेः टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. पेट्रोलपेक्षाही टोमॅटोचे दर जास्त आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात एक किलोसाठी 160 रुपये मोजावे लागत आहे. सध्या सगळीकडेच टोमॅटोच्या दराची चर्चा सुरू आहे. त्यातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. टोमॅटोमुळं विक्रेता आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली आहे. (Pune Crime News)

पुण्यात फ्री स्टाइल हाणामारी

टोमॅटोमुळे भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात हाणामारी होऊन जखमी करण्याचा प्रकार वडगाव शेरी भाजी मार्केटमध्ये घडला आहे. याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२, रा. गलांडेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी अनिल गायकवाड (रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टोमॅटोचे दर विचारले अन्... 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाल ढेपे हे भाजी आणण्यासाठी वडगाव शेरी येथील भाजी मार्केटमध्ये गेले होते. त्यांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांना टोमॅटोचा आजचा भाव विचारला. त्यांनी टोमॅटो २० रुपये पावशेर असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना खूप महाग आहेत. असे उत्तर दिले. त्यावरुन अनिल गायकवाड यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली, असं त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

भाजीविक्रेत्याने केली मारहाण

आरोपी अनिल गायकवाड यांनी ढेपे यांच्या तोंडावर बुक्कीने मारहाण केली. तसंच, वजन काट्यातील वजन हातात घेऊन त्यांच्या उजव्या गालावर मारुन जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. पोलीस हवालदार नांगरे याप्रकरणी तपास करीत आहेत.

बाजारात टोमॅटोचे दर चढेच

दरम्यान, टोमॅटोच्या किंमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 
टोमॅटोचे किरकोळ दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर काही ठिकाणी 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव 150 रुपये पार केले आहेत. 

टोमॅटोचे भाव कधी कमी होणार

शेतकरी व तज्ज्ञांच्या मते दिवाळीच्या आसपास टोमॅटोचे भाव कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आधी झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि मान्सूनमुळं टोमॅटोची आवक घटली आहे. म्हणूनच बाजारात टोमॅटोचे भाव वधारले आहेत. त्यामुळं भाव पुन्हा पुर्ववत होण्यासाठी दीड ते दोन महिने लागतील, असा अंदाज व्यक्त होतोय.