'PhD करणं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याइतकं सोपं नाही'; विद्यार्थ्यांनी थेट अजित पवारांनाच सुनावलं

Ajit Pawar PHD Statement : पीएचडी करणे म्हणजे पक्ष बदलण्यासारखं नाही, दहावी नापास अजित पवार यांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात विद्यार्थ्यांनी राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 13, 2023, 01:29 PM IST
'PhD करणं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याइतकं सोपं नाही'; विद्यार्थ्यांनी थेट अजित पवारांनाच सुनावलं title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय. सारथीच्या माध्यमातून पीएचडीसाठी 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप सरकारकडून दिली जाणार आहे. याबाबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यावर आता पीएचडी पदवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांना चांगलेच सुनावले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत शिष्यवृत्ती तसेच पीएचडी संदर्भात बोलताना धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्यामुळं राज्य सरकारचा संशोधकांच्या फेलोशिपला विरोध करत असल्याचं सांगत राज्यभर विद्यार्थ्यांच्याकडून अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केलं जात आहे. अजित पवार यांच्या विधानावर पुण्यातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी जे वक्तव्य केल आहे ते अशोभनीय आहे. दहावी नापास असलेल्या अजित पवार यांनी आम्हाला शिकवू नये की आम्ही किती शिक्षण घ्यायचं, असे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले विद्यार्थी?

"उपमु्ख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणं चुकीचे आहे. दहावी पास नेत्याने आमच्या पीएचडीची लायकी काढू नये. आम्ही पीएचडी करुन काय करतो हे सगळ्या देशाला माहिती आहे. ज्या तंत्रज्ञानाचे फायदे तुम्ही घेताय ते पीएचडी केलेल्या संशोधनातून आले आहेत. पीएचडी करुन देशाचे संविधान लिहीले जाते. डॉक्टर मनमोहन सिंग हे सुद्धा पीएचडी धारक होते. तुम्ही दहावी नापास आहात आधी दहावी पास व्हा," असा सल्ला एका विद्यार्थ्यांने दिला.

"विद्यार्थ्यांना मदत करण्याऐवजी असे विधान करणे हे क्लेशदायक आहे. चार संस्था समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असतात. या संस्थाच्या पीएचडी धारकांची संख्या 1000 होती. 200 विद्यार्थ्यांची अट का घातली याचे स्पष्टीकरण दिलं नाही. पीएचडी करणारे विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबियांतील आहे. याचा सर्वसामन्य विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याइतके पीएचडी करणे सोपे नाही. पीएचडी करणारा विद्यार्थी शास्त्रज्ञ असतो. त्याच्याकडे डोकं असतं पण पैसा नसतो. सरकारने मायबापाची भूमिका घेऊन आर्थिक सहाय्य करणे गरजेचे असते. पण सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे. ग्रामीण भागातल्या मुलांकडे सगळं काही नाही," असेही दुसऱ्या विद्यार्थ्याने म्हटलं आहे.