हैद्राबादच्या तरुणाचा काळू धबधब्यात बुडून मृत्यू; सहा दिवसांनी सापडला मृतदेह

Pune News : माळशेजमधील काळू धबधब्याजवळ पाय घसरुन एक पर्यटक बेपत्ता झाला होता. तरुणाचा बरेच दिवस शोध सुरु होता. पण तो सापडत नव्हते. या घटनेनंतर प्रशासनाने हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 20, 2023, 12:51 PM IST
हैद्राबादच्या तरुणाचा काळू धबधब्यात बुडून मृत्यू; सहा दिवसांनी सापडला मृतदेह title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पावसाळ्यात अनेकजण पावसाळी पर्यटनांचा आनंद घेताना दिसत आहे. मात्र अतिउत्सामुळे काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असाच काहीसा प्रकार माळशेज घाटातील (Malshej Ghat) प्रसिद्ध काळू धबधब्याजवळ घडला आहे. हैद्राबाद (Hyderabad) येथून आलेल्या एका तरुणाचा काळू धबधब्यात (kalu waterfall) पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल आठवड्याभरानंतर तरुणाचा मृतदेह सापडला आहे.

खिरेश्वर येथून मुरबाड तालुक्यात वाहत जाणाऱ्या काळू नदीच्या धबधब्यात हैद्राबाद येथील एक तरुण गेल्या आठवड्यात वाहून गेला होता. हा तरुण इतर मित्रांसह मुरबाड तालुक्यातील थीतबी गावाकडून काळू धबधबा येथे वर्षा विहारासाठी गेला होता. त्याचवेळी हा तरूण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. बरेच दिवस त्याचा शोध घेऊनही तो सापडत नव्हता. पाऊस,दाट धुके,पाण्याचा प्रवाह यामुळे शोध कार्यात अडथळे येत आहे. मात्र अखेर सहा दिवसांनी त्याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला आहे.

गेल्या रविवारी 13 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून चार तरुण दुपारी दोनच्या सुमारास थीतबी येथील काळू वॉटर फॉल येथे आले होते. टेकर्सबरोबरच पर्यटकांचेही हे आवडते ठिकाण आहे. तसेच सोशल मीडियावर हा धबधबा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्याने अनेक तरुण तरुणी तिथे येत असतात. काळू धबधब्याच्या या टप्प्याकडे मुरबाड तालुक्यातील थीतबी या गावातून जावे लागते. मृत 29 वर्षीय अभिषेक रावलकर हा देखील त्याच्या मित्रांसह तिथे आला होता. मात्र त्याचा तोल गेल्याने तो काळू नदीमध्ये पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अभिषेक वाहून गेला.

काळू नदीला खोल डोह आहे. त्यामुळे अभिषेक वाहून त्या डोहात गेला आहे. घटनेची माहिती मिळताच जुन्नर रेस्कू टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि त्याचा शोध सुरु केला. मात्र अंधार पडू लागल्याने शोधमोहीम थांबण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी परत शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. गेले सहा दिवस अभिषेकचा शोध सुरू होता. परंतु काळू धबधब्या खाली त्याचा शोध लागत नव्हता..सुरुवातीचे दोन ते तीन दिवस नदीपात्रात ड्रोन द्वारे शोधण्याचा प्रयत्न केला तरीही अपयशच आले होते. त्यानंतर रायगड रेस्क्यू टीमला पाचारण केल्यावर सहा दिवसांनी अभिषेकचा मृतदेह सापडला आहे.

धबधबा पर्यटकांसाठी बंद

काळु धबधबा हा सोशल मीडियामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र धबधब्यात पडून तरुण बेपत्ता झाल्यापासून काळू धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशानाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.