घर बांधण्याचे स्वप्न घेऊन निघाले अन् तितक्यात... टेम्पोखाली आल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पुण्यावर घरकामाचे सामान घेऊन कोंडीबा धोंडे आपल्या भावासोबत निघाले होते. त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात कोंडीबा धोंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत कोंडीबा ढेबे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Updated: Apr 1, 2023, 11:25 AM IST
घर बांधण्याचे स्वप्न घेऊन निघाले अन् तितक्यात... टेम्पोखाली आल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू title=

निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : पुण्याहून (Pune News) आणलेलं घराचे बांधकाम साहित्य (construction material) घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. वेल्हा तालुक्यातील शिरकोली गावाच्या हद्दीत हा टेम्पो उलटल्याने शेतकरी त्याखाली आला होता. यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कच्च्या दगडांच्या रस्त्यावरून पिकअप टेम्पो जात असतानाच तो उलटला आणि त्यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 

कोंडीबा आबाजी ढेबे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील शिरकोली गावाच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे. कोंडीबा आबाजी ढेबे पुण्यावरुन घराचे बांधकाम साहित्य घेऊन पिकअप टेम्पोने घरी जात होते. मात्र कच्च्या रस्त्यावरच टेम्पो उलटल्याने कोंडीबा ढेबे त्याखाली आले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. ढेबे यांच्या अपघाताती निधनाने शिरकोली पानशेत परिसरावर शोककळा पसरलीय. 

आपल्या नव्या घराचे स्वप्न उराशी बाळगून कोंडीबा उर्फ भाऊ आबाजी ढेबे पुण्यावरुन सामान घेऊन शिरकोली येथे निघाले होते. यावेळी कोंडीबा यांचा भाऊ तुकाराम ढेबेदेखील सोबत होते. कच्च्या दगडांच्या गोट्यांच्या रस्त्यावरून चढावरुन टेम्पो अचानक पलटी झाला. त्यावेळी टेम्पोमध्ये बसलेले ढेबे हे टेम्पोखाली आले. चाकाखाली आल्याने ढोबे यांचा जागीच मृत्यू झाला. मयत कोंडीबा ढेबे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर ट्रक उलटला

दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील कल्ले गावाच्या हद्दीमध्ये लाकडाने भरलेल्या ट्रकचा अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काळासाठी बंद झाली होती. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. हा ट्रक खेडवरून मुंबईत येत होता. अपघातामुळे ट्रकमधील लाकडे रस्त्यावर पसरली होती. त्यामुळ रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यानंतर काही लाकडे बाजूला करून एक मार्गीका खुली करण्यात आली.

कोल्हापुरात कंटेनरचा अपघात

बंगळुरुवरुन पुण्याला जाणाऱ्या आयशर कंटेनरचा कोल्हापूर शहराजवळ अपघात झाला होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोल्हापूर शहराजवळ हायवेवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. हा अपघातग्रस्त आयशर कंटेनर काही वेळ हायवेवरच होता. त्यामुळे हायवे पोलिसांनी तात्काळ हा कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न केला.