Pune News : पुण्यातील हडपसर भागात एक दुर्दैवी घटना घडली. 14 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत धामणगावकर हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वेदांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. राज्य शासनाने उन्हाचा कहर वाढल्याने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नवी मुंबईतील खारघर दुर्घटनेनंतर ही सुट्टी जाहीर केली. वेदांत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. शाळेला सुट्टी लागल्यामुळे तो मित्रांसोबत खेळत होता.
पोलिसांनी यांबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गुरुवारी सकाळी वेदांत त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याने वडिलांशी संपर्क साधला. वडिलांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वडिलांनी तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी वेदांत याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वेदांचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितले.
वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात लोकांमध्ये, विशेषत: तरुणामध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण बनले आहे. बदलती जीवनशैली, ज्यात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव हे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
वेदांतचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी दिल्याने वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लहान वयात मुलाचा मृत्यू झाल्याने वानवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाचा कहर वाढला आहे. त्यामुळे मुलांची काळजी घ्या, मुलांना उन्हात पाठवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.