Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. या अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यात गणपती बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे.
अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास करण्यात आली. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये हे आंब्याचं वाटप होणार आहे.
लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय बाप्पासमोर स्वराभिषेक करत संगीत सेवाही सादर करण्यात आली. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयानिमित्त सोनेखरेदीचा उत्साह असतो. अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोनं आणि चांदी काहीसं स्वस्त झालंय. त्यामुळे आज सोनेखरेदी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास तीन हजार कोटींच्या घरात उलाढाल होण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय अक्षय्य तृतीयेपासून अनेकजण आंबा खाण्यास सुरुवात करतात त्यामुळे आंबा खरेदीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाहन खरेदी, घर खरेदीसाठीही आजचा मुहुर्त साधला जाईल. आजच्या दिवशी लग्नही मोठ्या प्रमाणात होतात.