पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."

Sanjay Raut Dig At Congress Vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. मात्र राऊतांच्या या व्यक्तव्यावर छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 29, 2023, 12:36 PM IST
पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..." title=
Ajit Pawar Sanjay Raut

Pune Lok Sabha Seat Bypoll: महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा मतभेद दिसून येत आहेत. पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार (BJP MP) गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी (Pune Lok Sabha Seat) होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला संधी दिली जावी यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि विधानसभा निवडणुकीमधील मतदान पाहता राष्ट्रवादीने ही जागा लढावी असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे. असं असतानाच आता शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. 

अजित पवार काय म्हणाले?

पाटणमध्ये रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी, "काँग्रेसचा पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागील बऱ्याच काळापासून पराभव होत आहे. माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर ही जागा (काँग्रेसला) जिंकता आली नाही. जर आमचा मित्रपक्ष सातत्याने तिथे पराभूत होत असेल तर ही जागा तिथे चांगली कामगिरी करत असलेल्या पक्षाला दिली पाहिजे. आम्हाला वाटतं की आम्ही ही जागा लढवली पाहिजे. मात्र अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही. आम्ही यावर चर्चा करुन आणि निर्णय घेऊ," असं विधान केलं होतं.

काँग्रेसचं उत्तर

अजित पवारांच्या या विधानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कसब्याच्या निकालानंतर लोक पुन्हा काँग्रेसकडे वळत असल्याचं दिसून आल्याचं म्हटलं आहे. "आम्ही पुणे लोकसभा मतदारसंघातून लढणार. हा आमचा पारंपारिक मतदारसंघ आहे. आम्ही या ठिकाणी केवळ दोनदाच पराभूत झालो आहोत. कसब्याच्या निकालावरुन येथील लोकांचा भाजपाशी फारकत घेतल्याचं दिसत असून काँग्रेस पूर्ण तयारीने या निवडणुकीत उतरणार आहे," असं लोढेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे.

संजय राऊतांचा राष्ट्रवादीला टोला?

अजित पवार आणि काँग्रेसने केलेले दावे विरोधाभास असणारे आहेत यासंदर्भातील वृत्त शेअर करत संजय राऊत यांनी या पुण्याच्या जागेवरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. "कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा, हे सूत्र ठरले तर 'कसबा'प्रमाणे पुणे 'लोकसभा' पोटनिवडणूक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल," असं राऊत यांनी म्हटलं आहे. कसब्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे अशाचप्रकारे महाविकास आघाडीने एकजूट दाखवून लढा दिला तर लोकसभा पोटनिवडणूक जिंकता येईल असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला लगावताना, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे," असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी, "जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!" असंही ट्वीटच्या शेवटी म्हटलं आहे.

भुजबळांनी व्यक्त केली नाराजी

संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अशा चर्चा मिडीयामध्ये करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करुन यावर निर्णय घेऊ, असं उत्तर देत राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.