Pune Hit And Run Case: पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव ऑडी कारचालकाने एका तरुणाला धडक दिली. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समजत आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली असून रौफ अकबर शेख याचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या ऑडी चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी चक्काचुक झाली होती. तर, दुचाकीस्वाराचाही जागीच मृत्यू झाला होता. इतकंच नव्हे तर अपघातानंतर चालकाने तरुणाच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनेमुळं पुण्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा अपघात कोरेगाव पार्क परिसरातील गुगलच्या इमारतीसमोर घडला आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार कारचालक दारूच्या नशेत होता. तसंच, त्याच्या शेजारी बसलेला व्यक्ती सिगारेट ओढत होता. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे. तर, अपघातात मृत्यू झालेला रौफ शेख फुड डिलीव्हरीचे काम करायचा, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास रफीक शेख हा फुड डिलिव्हरी करण्यासाठी जात होता. त्याचवेळी भरधाव आलेल्या ऑडीने त्याला चिरडले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ऑडी चालकाने रौफ शेखला दोनदा धडक दिली. दुसऱ्या धडकेत रफीक शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ऑडी चालक सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, पुण्यात वारंवार घडत असलेल्या हिट अँड रन केस प्रकरणामुळं सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.