मैत्रिणीचा त्रास असह्य; 19 वर्षांच्या विद्यार्थिनीने बाथरुममध्ये स्वतःला पेटवून घेतले, पुण्यातील घटना

Pune Women Suicide: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.   

सागर आव्हाड | Updated: Mar 20, 2024, 11:53 AM IST
मैत्रिणीचा त्रास असह्य; 19 वर्षांच्या विद्यार्थिनीने बाथरुममध्ये स्वतःला पेटवून घेतले, पुण्यातील घटना title=
pune engineering college student girl set herself ablaze dies

Pune Women Suicide: पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती. उपचारादरम्यान 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. 

हॉस्टेल कॅन्टीनमधील कर्माचाऱ्याला छेडछाडीला कंटाळून आणि रुममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचचले असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. पुण्यातील प्रसिद्ध इंजिनीयरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 7 मार्च रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

रेणुका बालाजी साळुंके (वय 19) असं मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान सिद्धू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळं हॉस्टेल व महाविद्यालयात तणावाचे वातावरण आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका ही पुण्यात एका इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला सतत अश्लील मेसेज करुन त्रास द्यायचा. या सर्व प्रकारामुळं रेणुका खूप त्रासली व घाबरली होती. त्याचबरोबर, हॉस्टेलमध्ये तिच्याच रुममध्ये राहणारी मुस्कानदेखील तिला त्रास देत होती. रेणुकाला अभ्यास करु द्यायची नाही किंवा तिला जाणून बुजून त्रास होईल, अशी वागायची. या दोघांच्या त्रासामुळं वैतागलेली रेणुका नैराश्यात गेली होती. 

हॉस्टेलमध्ये होणारा सततचा त्रास आणि मानसिक तणाव याला कंटाळून रेणुकाने 7 मार्च रोजी हॉस्टेलच्या बाथरुममध्ये स्वतःला पेटवून घेतले. हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

अटल सेतूवर महिलेची आत्महत्या

मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात मोठा सागरी पूल असलेल्या  अटल सेतूवर मुबंई येथे राहणारी 43 वर्षीय डॉक्टर महिलेने उडी मारून आत्महत्या केली आहे. ही महिला मुंबईमधून आपल्या घरून टॅक्सीने अटल सेतू वर आली होती. मला फोटो काढायचा आहे असं सांगून टॅक्सी थांबवली आणि  ब्रीज वरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शिवडी पासून 14 किलोमीटर अंतरावर घडली याबाबत टॅक्सी ड्रॅयव्हरने पोलिसांना सूचना दिली. 

टॅक्सी ड्रायव्हरच्या सूचनेनंतर तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली पण अद्याप या महिलेचा मृतदेह मिळाला नसून नाव्हाशेवा पोलीस, कोस्टल पोलीस आणि  मच्छिमार  बांधव  यांच्याकडून शोध घेतला जात आहे. महिला आपल्या वृद्ध आई वडीलांसोबत वास्तव्यास असून पेशाने डॉक्टर असून दहा वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे वडिलांनी  सांगितले. तसेच तिने  घरातून निघताना सुसाईड नोट लिहली होती त्यात तिने अटल सेतूवरून आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.