Demand For 2 Deputy Sarpanchs: गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजपचे सरकार आले. महाराष्ट्रातील जनतेचा विकास वेगाने व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान एक वर्षातच शिवसेना-भाजपला राष्ट्रवादीची साथ मिळाली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं ट्रिपल इंजिन असलेलं सरकार अधिक वेगाने काम करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. याच पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असे प्रयोग करण्यात यावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे.
महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दोन उपसरपंच असावेत अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या सरपंच अंकिता भुजबळ आणि उपसरपंच राहुल भुजबळ यांनी यासंदर्भात निवेदन लिहिले आहे.
राज्याच्या कारभाराप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभारही अधिक वेगाने व्हावा यासाठी ही मागणी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासंदर्भात काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.