नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन बदलू नका; ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 'या' शहरातील प्रवाशांना मोठा फायदा

Dighe railway station: नवी मुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. लवकरच दिघे लोकल स्थानक सुरु होण्याची चिन्हे आहेत. येत्या 10 दिवसांत प्रवाशांना खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 9, 2023, 11:25 AM IST
नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन बदलू नका; ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 'या' शहरातील प्रवाशांना मोठा फायदा title=
Dighe railway station to be opened together soon

Dighe Railway Station: नवी मुंबईतील (Navi Mumbai) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर येतेय. उरण लोकल (Uran Local) आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील (Trans-Harbour line) दिघा रेल्वे स्थानक (Dighe Railway Station) लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याची चिन्हे आहेत. मध्य रेल्वेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बेलापूर-खारकोपर-उरण मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानक येत्या १० दिवसांत सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. (Mumbai Local Train News)

दिघा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण ६ एप्रिल रोजी करण्यात येणार होते. मात्र,काही कारणांमुळं हे रखडले होते. मात्र, आता रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सज्ज झाले असून लवकरच स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. विटावा, दिघा येथील रहिवाशांसाठी हे स्टेशन फायदेशीर ठरणार असून गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिक या स्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. 

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा पहिला टप्पा म्हणजे दिघा स्थानक आहे. हे स्थानक खुले झाल्यानंतर ट्रान्सहार्बर मार्गावरील सर्व लोकल या स्थानकांत थांबणार आहेत. या स्थानकाचे काम 200 कोटी रुपये खर्चून पूर्ण केले आहे. या स्थानकामुळं कल्याण ते नवी मुंबई प्रवास सुकर होणार आहे. विटावा व दिघा परिसरातील नागरिकांना लोकल पकडण्यासाठी ठाणे किंवा ऐरोली स्थानक गाठावे लागते. मात्र आता दिघा स्थानक सुरु झाल्यानंतर त्यांचा त्रास कमी होणार आहे. 

मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणाऱ्या या स्थानकाची घोषणा 2014 साली झाली होती. 2016 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्थानकाचे भूमीपूजनदेखील झाले होते. मात्र भूमी अधिग्रहणामुळं प्रकल्पांला उशीर होत आहे. स्थानकावर दोन फलाट असून त्यांची लांबी २७० मीटर आणि रुंदी १२ मीटर असणार आहे. स्थानकावर लिफ्ट आणि चार सरकते जिने असणार आहे, अशीही माहिती मिळतेय. येत्या दहा दिवसांत हे स्थानक सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय. 

सर्व लोकल थांबणार 

दिघा रेल्वे स्थानकात ट्रान्सहार्बर मार्गावरील सर्व लोकल स्थानकात थांबणार आहे. एमयूटीपी-3 मधील कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचा पहिला टप्पा दिघा स्थानक आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कळवा एलेव्हेटेड रेल्वे स्थानक बांधले जाणार आहे. हा मार्ग दिघा स्थानकाला जोडणा जाणार आहे. कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरहून येणार्‍या प्रवाशांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन पकडावी लागते. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना कळवा स्थानकातून नवी मुंबईसाठी लोकल मिळणार आहे. त्यामुळं ठाणे स्थानकातील गर्दीदेखील कमी होणार आहे.