सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : छळास कंटाळून पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. या घटनेत पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
दारुच्या नशेत मारहाण करणाऱ्या पतीला भीती दाखविण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवून दिल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीवरुन पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा मारुती कुंजीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृता आणि अक्षय कुंजीर यांचे 2020 मध्ये लग्न झाले आहे. अक्षय दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता. अक्षयने 12 सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर पत्नीला घरातून निघून जा,असे सांगितले. त्यावर पत्नीने छळास कंटाळून मी मरुन जाते, असे म्हणत घरात शेतीपंपासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी अक्षयने काडीपेटीने आग लावून अमृताला पेटवून दिले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलमुळे आगीचा भडका उडाला. त्यानंतर अक्षयनेच अमृताच्या अंगावर पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत भाजल्याने अमृताची छाती, गळा आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर अमृताला ससून रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर सासू आशा कुंजीर यांनी हा प्रकार कोणाला सांगू नको, असे म्हणत सुनेला दमदाटी केली होती. तू जर तुला पतीने पेटवले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाही, अशी भीती सासूने घातली. त्यामुळे घाबरलेल्या अमृताने चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतले गेल्याने भडका होऊन भाजल, असे लोणी काळभोर पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला. पोलिसांनी याप्रकरणी सासू आशा कुंजीर आणि अक्षय कुंजीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.