Pune Crime: समस्त पालकवर्गाला संताप आणि चीड आणणारी घटना पुण्यातील शाळेत घडली आहे. शाळेच्या चेंजिंग रुमध्ये मोबाईल कॅमेरा ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिपाई यानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे समोर आले आहे. तुषार सरोदे असे या शिपायाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
शाळेतील किचनरूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडीओ मोबाईल कॅमेराने रेकॉर्ड केले जायचे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार उघडकीस आला.
शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूम मध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा आधीच उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले. शिपाई सरोदे याने चेंजिर रूमच्या एका स्विच बोर्डवर आपला मोबाईल ठेवला. त्यात कॅमेरा सुरु होता. हा सगळा प्रकार विद्यार्थिनींच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ मोबाईलमधून व्हिडीओ डिलीट केले.
घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितला. यानंतर पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. संतापलेल्या पालकांनी शाळेतील मुख्यधापिकेची भेट घेतली. मुख्याध्यापकांनी पालकांसमोर शिपाई सरोदे याला जाब विचारला. पण त्याने आपण असे काही केले नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान शाळेच्या मॅनेजमेंटपर्यंत हा गंभीर प्रकार पोहोचला. त्यांनी केलेल्या चौकशीत आपण हा मोबाईल रेकॉर्डिंग साठीच ठेवला होता, अशी कबुली शिपाई सरोदेने दिली. यानंतर शाळेच्या मॅनेजमेंटकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पुणे पोलिसांनी तात्काळ शिपाई सरोदे याला अटक करत गुन्हा दाखल केला. त्याच्याविरोधात पोक्सोसह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत.