Pune Crime : तू मार खाण्याचाच लायकीचा आहे... महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं

Pune Crime : दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने धानोरी परिसरात असलेल्या एका खाणीत उडी मारून स्वतःला संपवले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजारच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Updated: Mar 27, 2023, 09:34 AM IST
Pune Crime : तू मार खाण्याचाच लायकीचा आहे... महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune News) धानोरी परिसरात दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने खाणीमध्ये उडी मारत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. तपासानंतर आत्महत्या केलेली व्यक्ती रिक्षाचालक (auto rickshaw) असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी शेजारच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस (Pune Police) अधिक तपास करत आहेत.

खाणीत उडी मारली अन्...

अजय शिवाजी टिंगरे (42) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. अजय टिंगरे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. अजय टिंगरे यांनी दारू पिऊन घरी आल्यानंतर दारात उभे राहून शिवीगाळ केली होती. त्यानंतर शेजारच्यांनी घरात घुसून अजय टिंगरे यांना मारहाण केली होती. यामध्ये काही महिलांनी देखील अजय टिंगरे यांना घराबाहेर काढत मारहाण केली होती. संपूर्ण गावासमोर महिलांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा अपमान सहन न झाल्याने अजय टिंगरे यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि खाणीत उडी मारली.

दारु प्यायल्यानंतर घातला गोंधळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय टिंगरे 23 मार्च रोजी रात्री दारु पिऊन घरी आले होते. त्यानंतर त्यांनी दारात उभे राहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजारच्यांनी अजय टिंगरे यांच्या पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या पतीला समजावून सांगण्यास सांगितले. मात्र तरीही अजय टिंगरे ऐकत नव्हता. शेवटी पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी समज दिल्यानंतर अजय टिंगरे घरात जाऊन झोपला.

शेजारच्यांनी केली मारहाण

मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी अजय टिंगरे यांच्या शेजारचे जबरदस्तीने त्याच्या घरात शिरले आणि झोपेत असतानाच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर आणले. अजय टिंगरे यांच्या पत्नीने त्यांना मारू नका अशी विनवणी केली. मात्र तो मार खाण्याच्या लायकीचाच आहे. त्याला मारा, असे शेजारच्यांनी सांगितले आणि मारहाण सुरुच ठेवली. आरडाओरडा पाहून शेजारचे जमा होऊ लागले. त्यानंतर शेजारच्यांनी तिथून काढता पाय घेतला. 

मारहाणीची तक्रार देण्यासाठी अजय टिंगरे यांची पत्नी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र गावातच आपल्याला महिलांनी मारहाण केल्याचा अपमान अजय टिंगरे यांना सहन झाला नाही आणि त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. अपमानाची भावना मनात ठेऊन अजय टिंगरे आपली रिक्षा घेऊन घराबाहेर पडले. रागाच्या भरात त्यांनी धानोरी रस्त्यावरील खाणीत उडी मारली आणि आपली जीवन यात्रा संपवली. 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह 4 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.