शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह

Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.

अरूण म्हेत्रे | Updated: Apr 8, 2024, 12:05 PM IST
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनामंध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यात कॉलेजच्या तरुणांपासून शाळकरी मुलांपर्यंत गुन्हेगारी पसरताना दिसत आहेत. पुण्यामध्ये शिकत असलेल्या तरुणीचा तिच्याच मित्रांनी नऊ लाखांच्या खंडणीसाठी खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा तरुणीचा मृतदेह नगर तालुक्यातील सुपा परिसरातून ताब्यात घेतला.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे असं खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. भाग्यश्री मूळची लातूर जिल्ह्यातील होती. पुण्यातील वाघोली परिसरातील कॉलेजमध्ये इंजीनियरिंगचे शिक्षण घेत होती. भाग्यश्रीचा मित्र शिवम फुलावळे यानं त्याचे साथीदार सागर जाधव आणि सुरेश इंदुरे यांच्या मदतीने तिचं अपहरण करून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे. तिघांनाही विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

30 मार्च रोजी भाग्यश्रीचा तिच्या आईसोबत बोलणं झालं होतं. मात्र 31 मार्च पासून भाग्यश्रीचा मोबाईल बंद होता. त्यानंतर दोन एप्रिलला भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर तुमच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं असून तिच्या सुटकेसाठी नऊ लाख रुपये तातडीने द्या असा मेसेज आला होता. भाग्यश्रीच्या वडिलांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर भाग्यश्रीचा खून करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. आरोपींनी तिचा मृतदेह नगर जिल्ह्यातील सुपा गावाजवळ एका शेतात पुरून ठेवला होता.

भाग्यश्री ही वाघोलीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. 30 मार्च रोजी संध्याकाळी तिचे आईसोबत मोबाइलवर झालं होतं. तेव्हा भाग्यश्रीने आपण मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी विमाननगरमधील फिनिक्स मॉलमध्ये जाणार असल्याचे आईला सांगितले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी 31 मार्च रोजी भाग्यश्रीच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पुणे गाठत ती बेपत्ता झाल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दिली.

त्यानंतर अचानक 2 एप्रिल रोजी भाग्यश्रीच्या मोबाईलवरुन पालकांच्या मोबाईलवर मेसेज आला. तुमच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. मुलीची सुखरूप सुटका करण्यासाठी तातडीने नऊ लाख रुपये द्या. अन्यथा मुलीचे बरेवाईट करू, असे मेसेजमध्ये म्हटलं होते. भाग्यश्रीच्या वडिलांनी याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विमानतळ पोलिसांनी तांत्रिक तपासात भाग्यश्रीचा मित्र शिवम फुलावळे याला ताब्यात घेतलं.

पोलीस तपासात शिवमने मित्राच्या मदतीने भाग्यश्रीची हत्या केल्याची कबुली दिली. शिवमने झुम कार ॲपवरून गाडी भाडयाने घेतली होती. ३० मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले. मात्र  पैसे मिळाले तरी भाग्यश्री घरी आपले नाव सांगेल या भीतीने आरोपींनी तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. आरोपी शिवम फुलावळे कर्जबाजारी झाला होता. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास पैसे मिळतील, असे त्याला वाटले होते. त्यामुळे त्याने भाग्यश्रीला संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.