पुणे : शहरातील काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले आहेत. आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या फलकाला काळे फासले. त्यामुळे काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. हा वाद मिटणार नसल्याचे आजच्या घटनेवरुन दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातून आमदार झालेल्या नेत्यांच्या अभिनंदनाचा फलक काँग्रेस भवन परिसरात आहे. त्यावर संग्राम थोपटे यांचेही छायाचित्र होते. त्याला आज काळे फसण्यात आले.
आमदार संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी काल काँग्रेस भवनमध्ये जाऊन काचा, टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली होती. त्यावर आज प्रतिक्रिया उमटली असून थोपटे यांच्या फलकाला काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शहर विरुद्ध ग्रामीण असा सुरु झालेला संघर्ष थांबणार कधी, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या समर्थक कार्य़कर्त्यांनी मंगळवारी पुण्यात राडा घातला. शिवाजीनगर येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात संग्राम थोपटे यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते.
या पार्श्वभूमीवर काल सकाळपासूनच भोर मतदारसंघात तणावाचे वातावरण होते. अखेर काल दुपारच्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर येथील काँग्रेसच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. त्यांनी कार्यालयात घुसून सामानाची तोडफोड केली. त्यामुळे आता पुण्यातील वातावरण चांगलेच तापले होते. आज दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संग्राम थोपटे यांच्या छायाचित्राला काळे फासले. त्यामुळे हा वाद निवळण्याआधीच जास्तच पेटण्याची चिन्हे दिसून येत आहे.