Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर?

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक  महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 950 मतांनी विजय मिळवत भाजपाचा करेट कार्यक्रम केला. कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल रवींद्र धंगेकर यांच्याबाजुने लागला.

Updated: Mar 2, 2023, 12:44 PM IST
Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर? title=

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 : निवडणुकीच्या आधी भाजपकडून कोण आहेत हे रवींद्र धंगेकर, असा प्रचार करण्यात आला होता. मात्र, त्याच धंगेकरांनी भाजपला पराभवाचा दे धक्का दिला आहे. 28 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि ते विजयी झालेत. मात्र,  धंगेकर हे काँग्रेसमध्ये येण्याआधी शिवसेनेत कार्यरत होते. त्यानंतर ते मनसेत गेले. मनसेतून ते काँग्रेसमध्ये दाखल झालेत आणि काँग्रेसकडून त्यांना कसबा पेठ पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली. 

 चारवेळा वेळा नगरसेवक

रवींद्र धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू होते. मनसेत त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले. मनसेत त्यांचे राजकीय वजन वाढले. चारवेळा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पालिकेच्या माध्यमातून त्यांनी कसबा पेठ मतदारसंघात अनेक कामे केलीत.Pune Bypoll Results : निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स 

रवींद्र धंगेकर यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढली होती. यावेळी  त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना मोठे आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. बापट यांनी नवख्या धंगेकरांवर केवळ 7 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर ते बापट यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख झाली.

कसबा पेठेतून धंगेकर यांनी निवडणूक लढवली, पण

दरम्यान, 2014  मध्येही कसबा पेठेतून धंगेकर यांनी निवडणूक लढवली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 2017 मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना काँग्रेसकडून 2019 मध्ये तिकीट मिळाले नाही. यावेळी अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

महाविकास आघाडीकडून धंगेकर यांना उमेदवारी देताना राजकीय गणित मांडले गेले.  धंगेकर हे ओबीसी समाजातून येतात. त्यामुळे कसबा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाचा मोठा टक्का आहे, याचा विचार करुन त्यांना उमेदवारी देण्यात आली. जात हा मुद्दाही या मतदारसंघात कळीचा होता. कसबा हा जुन्या पुण्याच्या पेठांचा भाग आहे. कसबा पेठेसह शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, लक्ष्मी रोड, तुळशीबाग या भागांचा समावेश या मतदारसंघात होतो. या भागात ब्राह्मण, मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे.

कसबा पेठ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ. जवळपास 40 वर्षं इथे भाजपला विजय मिळाला आहे. मात्र, यंदा या मतदारसंघाचं गणित वेगळं आहे. एका बाजूला दगडूशेठ गणपती आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणारा हेमंत रासने यांच्यासारखा उमेदवार भाजपने मैदानात उतरवला आहे. तर दुसरीकडे भाजपसमोर महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे धंगेकरांना इतर घटक पक्षांची साथ हे गणित हेरुन त्यांना उमेदवारी मिळाली.