पुणे : पावसामुळं रस्त्यावर तुंबलेलं पाणी घरात शिरू नये म्हणून पुण्यातल्या एका माणसानं नामी शक्कल लढवलीय. आपण गाडीचा पंक्चर टायर बदलताना जॅक लावून गाडी उचलतो. याच तंत्राचा वापर करून पुण्यातील भारद्वाज नावाचा हा दुमजली बंगला चक्क ४ फूट वर उचलण्यात आलाय. २ हजार २०० चौरस फुटांचा हा बंगला वर उचलण्यासाठी सुमारे २०० जॅक लावण्यात आलेत.
वानवडी परिसरात राहणाऱ्या शिवकुमार अय्यर यांचा हा बंगला आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी, गटाराचं पाणी त्यांच्या घरात शिरु लागलं. यामुळं त्रासलेल्या अय्यर यांनी स्वत:चं घर वर उचलण्याचं ठरवलं. त्यासाठी हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असून, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना हा उपाय सापडला. पुण्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग होत असल्यानं, हा तरंगता बंगला पाहण्यासाठी सध्या पुणेकरांची याठिकाणी गर्दी होतेय.