दहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध राज्यभरातून करण्यात येत आहे.

Updated: Feb 16, 2019, 06:38 PM IST
दहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप title=

मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात आले. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. सकाळपासून बंद असलेली रेल्वे वाहतूक पाच तासांनंतर पुन्हा सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलंय. या आंदोलनादरम्यान रस्तेही अडवण्यात आले होते. ठिकठिकाणी पुतळेही जाळण्यात आलेत. पोलिसांकडून नागरिकांना शांततेत निषेध व्यक्त करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

सांगलीत बाजारपेठा आणि व्यापार बंद 

दरम्यान, पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज जळगाव, कल्याण आणि सांगलीमधील बाजारपेठा आणि व्यापार बंद ठेवण्यात आले आहेत. जळगावातही फुले बाजारपेठेसह अन्य व्यापारी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी घोषणाबाजी देत युवा कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. कल्याण पश्चिमेमध्ये बाजारपेठा बंद ठेवत व्यापाऱ्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढली. भाजपा आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण जिल्हा भाजपाच्या वतीने निषेधही व्यक्त करण्यात आला. सांगली परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून भारतीय सैन्यांवरील झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. सांगली पोलीस दलातर्फे एक दिवसाचं वेतन शहिदांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या!

यवतमाळच्या दाभाडीत महिलांनी आज धरणं आंदोलन केलं. पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या, आम्हाला काहीही दिले नाही तरी चालेल अशी आर्त हाक या महिलांनी दिलीय. आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा दाभाडीमध्ये आले होते, त्यावेळी महिलांनी ही भावना व्यक्त केली. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये संताप आहे. मात्र संताप असला तरी उन्माद कोणीही दाखवू नका असं आवाहन माजी वायुदल प्रमुख प्रदीप नाईक यांनी केले आहे.

पाकिस्तानची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. लातूरमध्ये शिवसेनेकडून पाकिस्तानची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेतील पुतळ्याचे दहनही शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं. दयानंद गेट पासून हलगी वाजवून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

वीरपुत्रांना सलाम; लोटला जनसागर

काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव काल श्रीनगरहून दिल्लीत आणले होते. ते आज जवानांच्या घरी पाठवले जात आहेत. बुलडाणामधील मलकापूर येथे शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. वंदे मातरमच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. जमलेल्या समुदयामध्ये संतापाची भावना दिसून येत होती. शहीद संजय राजपूत यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्ह्यातुन तरुणांची गर्दी मलकापूर येथे पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक गर्दी होती. जवळपास एक ते सव्वा लाखांच्या आसपास अंत्यदर्शनासाठी गर्दी जमली आहे. तसेच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले गेले आहे. लोणारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. याठिकाणीही मोठी गर्दी झाली होती.